Published on
:
22 Jan 2025, 2:37 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:37 pm
डोंबिवली : शासनाने दिलेल्या निर्देशांशानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डोंबिवलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांत केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग आढळून आला.
या पंधरवड्याचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या गावदेवी उद्यानात संपन्न झाला. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी या उद्यानात उपस्थित असलेल्या नागरिकांसह मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील जास्तीत जास्त सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मराठीतून गीत गायन, हस्ताक्षर, चारोळ्या आणि महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, म्हणी, वाक् प्रचार, आदी इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी मंगळवारी आयोजित करण्यात आलेली मराठी गीत गायन स्पर्धेला, तसेच बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर स्पर्धेस महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा येत्या रविवारी कल्याण पश्चिमेतील सिटी पार्क येथे संपन्न होणार असल्याची माहिती मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी दिली.