Published on
:
22 Jan 2025, 2:32 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:32 pm
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथे डेंग्युचे रुग्ण आढळले असून चार रुग्ण बाधित निघाले आहेत. मात्र या चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा मोखाडा तालुका आरोग्य विभागाने दिला आहे. दरम्यान डेंग्यू च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण चालू केले असून प्रत्येक घरटी तपासुन रक्त नमुने घेतले जात आहेत.
तालुक्यातील मध्यवर्ती असलेले डोल्हारा गाव डेंग्युच्या विळख्यात सापडले असून येथील लक्ष्मी रवींद्र दोरे (32),हिरा काशिनाथ आस्वले (58),संगीता कैलास उघडे (44),देविदास पांडुरंग कोरडे (38) हे चार रुग्ण डेंग्यूने बाधित झाले असून या चार रुग्णांना थंडी, ताप, हात, पाय, डोके दुखणे अशा तक्रारी जानवू लागल्या होत्या, त्यानुसार शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी त्यांचे रक्त नमुने डहाणू येथील प्रयोग शाळेत पाठवले असता डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आला असून मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर यांनी त्याची गंभीर दखल घेत प्रत्येक घरटी सर्व्हेक्षण चालू केले असून 219 घरांपैकी 133 घरातील 619 सदस्यांची तपासणी केली आहे. तसेच 405 पाणी साठवणुकीचे बॅरल तपासले असून यात 16 बॅरल मध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. काही ठिकाणी पाणी ओतून भांडे उपडे करायला सांगितले आहेत तर काही ठिकाणी जीवन संजीवनी औषधाची उपाय योजना करण्यात आली आहे.
दरम्यान, 133 घरातील 619 सदस्यांची तपासणी केली असता यात 11 संशयीत रुग्ण हे डेंग्यू सदृष्य रोगाचे आढळून आले आहेत. यामध्ये यशवंत रामा पाडेकर (40),मधु काशीराम गोडे (86), तेजराज दिलीप शिंदे (14), यशोदा धोंडू वारघडे (60), प्रभाकर दिलीप जाधव (26), सोमा धोंडू जाधव (55), सकू धोंडू जाधव (65), भिमी भाऊ कडू (63),भाऊ महादू जाधव (46),आशा विलास पालवे (42), हे अकरा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यांचे रक्त नमुने एकत्रित करून डहाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. चत्तर यांनी सांगितले.
एकूणच परिस्थिती आटोक्यात असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साठवणूकीच्या भांड्यांची वेळोवेळी स्वच्छता करण्याचे तसेच पाणी दीर्घकाळ साठवून न ठेवण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर यांनी केले आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी धुमकेतू सारख्या उगवतात
डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डोल्हारा आरोग्य उपकेंद्राकडे असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रांजल जाधव येथे नियमित हजर राहत नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.तसेच या धुमकेतू सारख्या उगवणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियमित हजर राहण्याच्या सूचना करण्याचे यावेळी ग्रामस्थांनी सुचवले आहे.
आमचे गाव दीड ते पावणेदोन हजार लोकवस्तीचे आहे. आधीच आरोग्यसेवा विस्कळीत असून समुदाय आरोग्य अधिकारी कधीतरी येतात. स्थानिक ग्रामस्थांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.
- संजय डहाळे, ग्रामस्थ डोल्हारा