गांजाची विक्री करणाऱ्या तस्कराला विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली.Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 2:48 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:48 pm
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीकडे असलेल्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील सिध्दार्थनगरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या 35 वर्षीय तस्कराला विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. या इसमाकडून 81 हजार रूपये किंमतीचा 3 हजार 207 ग्रॅम वजनाचा गांजा या पथकाने जप्त केला.
लीलाधर सुरेश ठकार (35, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी, कोपर क्रॉस रोड, हनुमान मंदिर शेजारी, डोंबिवली-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पश्चिममध्ये कोपर हद्दीतील सिध्दार्थनगर भागात एक इसम अंमली पदार्थ विकण्यास बसला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नियंत्रणाखालील विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
या पथकाने सिध्दार्थनगर भागात हनुमान मंदिर शेजारी सापळा लावून लीलाधर ठकार याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. जुनी डोंबिवली, कोपर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा भागात काही इसम अनेक वर्षापासून किरकोळ पध्दतीने एमडी पावडरसह गांजाची तस्करी करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. ही तस्करी ठाणे ते कर्जत पट्ट्यात अधिक प्रमाणात चालते अशी चर्चा आहे.
डोंबिवलीतील जुगार अड्ड्यावर कथित भाईंचा कब्जा
पश्चिमेकडे असलेल्या देवीचापाड्यातील सत्यवान चौकात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही तथाकथित भाई जुगार अड्डा चालवत होते. याच भाईंची स्थानिक भागात दहशत असल्याने कोणत्याही स्थानिक रहिवाशाची त्यांच्याविषयी उघडपणे बोलण्याची हिम्मत होत नव्हती. या जुगार अड्ड्यांच्या ठिकाणी जुगारी त्यांची वाहने रस्त्यावर उभी करत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असे. त्यातील काही इसम तडीपार होऊन पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करू लागले आहेत. राजकारणी मुखवटा परिधान केलेल्या या कथित भाईंचा आपण कुणालाही घाबरत नाही, असा तोरा आहे.
सत्यवान चौकातील जुगार अड्डा, देवीचा पाड्यातील जेट्टीजवळ असलेल्या गांजाच्या अड्ड्याविषयी करण्यात आलेल्या तक्रारींची पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेतली. स्थानिक विष्णूनगर पोलिस आणि विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई होण्यापूर्वी जुगार अड्ड्यावरून भाई गायब झाले. देवीचा पाडा जेट्टी, कलावतीआई मंदिर परिसर, गोपीनाथ चौक, कुंभारखाणपाडा, गणेशनगर गणेशघाट, नवापाडा, रेल्वे मैदान भागात विशेष पोलिसांची गस्त वाढल्याने अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. सद्या नशेखोर मंडळी दिसेनाशी झाली आहेत.
नोकरदारांसह विद्यार्थ्यांवर दहशत
महाराष्ट्रनगरमध्ये गोपीनाथ चौकाजवळील धवनी इमारतीच्या समोरील भागात एक कचरा टाकण्याची जागा आहे. या भागातील एका पडिक इमारतीच्या जागेत रात्रीच्या सुमारास काही गांजा तस्कर पडदे लावून बसत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. रात्रभर हे बदमाश त्या भागात धिंगाणा घालून जागरण करत असतात घालतात. परिणामी रात्री झोपमोड होते आणि सकाळी कामावर जायला नोकरदार मंडळी व शाळा/कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतो, अशीही रहिवाशांची तक्रार आहे.