सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सोहळा सुरू आहे. जगभरातील भाविक या ठिकाणी आले आहेत. अनेक साधू, संत या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे महाकुंभमध्ये भक्ती आणि श्रद्धेचा महापूर ओसंडून वाहू लागला आहे. वेगवेगळे साधू त्यांच्या अनोख्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. एवढेच नव्हे तर सामान्य लोकही महाकुंभमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. यात तीन नावांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. हर्षा रिछारिया, मोनालिसा आणि अभय सिंह अर्थात IITian बाबा हे ते तिघे आहेत. या तिघांनी गेल्या काही दिवसात मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. महाकुंभाच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड करणाऱ्या हर्षा रिछारियाला “सर्वात सुंदर साध्वी” म्हणून नावाजलं होतं. परंतु, जेव्हा निरंजनी अखाड्याच्या रथावर बसलेल्या हर्षाला पाहण्यात आले, तेव्हा मात्र वाद सुरू झाला होता,.
काही संतानी हर्षा रिछारियावर आक्षेप घेतला होता. तिच्या रथावर बसण्याचा आणि भगवे वस्त्र परिधान करण्यावर हा मुख्यत: आक्षेप होता. त्यावरून चांगलाच वाद रंगला होता. अनेक संतानी तिची चांगलीच कानउघाडणी केली होती. मीडियानेही मसाला लावून या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे परिणाम व्हायचा तोच झाला. हर्षाला रडत रडतच महाकुंभ सोडण्याची घोषणा करावी लागली. तिचे रडतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी मोनालिसाही महाकुंभ सोडून गेली आहे. मोनालिसाच्या वडिलांनी तिला महाकुंभ सोडण्याचा सल्ला दिला होता, असं सांगितलं जातं. तर IITian बाबा अर्थात अभय सिंग यावर अखाड्यात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सुंदर असणं शाप
हे सुद्धा वाचा
इंदोर येथील मोनालिसा महाकुंभात फुल विकण्यासाठी आली होती. परंतु तिच्या सुंदरतेमुळे ती चर्चेत आली. आकर्षक चेहरा, गोरीपान कांती आणि निळेशार डोळे यामुळे तिची थेट बॉलिवूडच्या कलाकारांसोबत तुलना केली जात होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्या डोळ्यांवर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे तिचे वडील नाराज झाले आणि त्यांनी तिला महाकुंभ सोडून घरी परत जाण्याचा सल्ला दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती फुलं विकण्यासाठी आली होती. लोकांनी तिला फुलं विकू दिली नाहीत आणि गुपचूप व्हिडिओ बनवला. त्यामुळेच तिला कुंभ सोडावं लागलं, असं मोनालिसाच्या बहिणीने सांगितलं.
हर्षाने सांगितलं कारण
हर्षा रिछारियाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत ती खूप रडताना दिसते. लोकांना लाज वाटली पाहिजे. जी मुलगी धर्माबद्दल जाणून घेण्यासाठी आणि सनातन संस्कृती समजून घेण्यासाठी आली होती, तिला तुम्ही महाकुंभात राहू दिलेच नाही. तो कुंभ, जो आमच्या जीवनात एकदाच येतो. तुम्ही त्या व्यक्तिला त्यापासून दूर लोटलंत. मला त्याच्या पुण्याची कल्पना नाही, पण आनंद स्वरुपजींनी जे केले त्याच्या पापासाठी ते निश्चितच दोषी ठरतील, असं हर्षा या व्हिडीओत म्हणाताना दिसते.
जुन्या आखाड्याची बंदी
दुसरीकडे IITian बाबावरही गडांतर आलं. त्यांना जुन्या आखाड्याने प्रवेश करण्यास बंदी घातली. IIT बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अभय सिंग यांनी IIT बॉम्बेमधून शिक्षण घेतले होते. त्यांच्यावर त्यांच्या गुरुविरुद्ध अपशब्द वापरण्याचा आरोप आहे. यामुळे बाबांना आखाड्याच्या छावणीमध्ये आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संन्याशामध्ये शिस्त आणि गुरुप्रती भक्ती महत्त्वाची आहे. जो याचे पालन करत नाही, तो साधू बनू शकत नाही, असं आखाड्याचं म्हणणं आहे.