मानोरा(Washim) :- पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नायनी जनुना मार्गे धामणगाव रस्त्याचे काम पूर्ण झाले. रस्त्याचे काम सुरू असताना वाहनाच्या येण्या जाण्याने आमच्या शेतीचे धुरे फोडून जमिनी सपाट झाल्या होत्या. तसेच वहीवाटीच्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचे काम करून देण्यात यावे, याकरीता स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पिडीत शेतकऱ्यांनी (Farmers)आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. त्यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांनी उपोषणाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकारी यांना सोबत घेऊन पर्यायी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते.
वहीवाटीचा पर्यायी करून न दिल्यास प्रजासत्ताक दिनापासून उपोषण
मात्र पाच महिन्याचा कालावधी उलटूनही न्याय न मिळाल्याने प्रजासत्ताक दिन दि. २६ जानेवारी पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशाऱ्याचे निवेदन पिडीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नायनी , जनुना मार्गे धामणगाव पर्यंत रस्त्याचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. रस्ता काम करताना ये – करणाऱ्या वाहनाने शेतीचे धुरे फोडून सपाट करण्यात आले. तसेच वाहीवाटीच्या रस्त्यात पुलाचे काम सुध्दा करण्यात आल्याने पर्यायी रस्ता करून देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी महसूल विभागाचे व संबंधित अधिकाऱ्यांनी मधस्थी करून येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण आश्वासन हवेत विरल्यामुळे ये – जा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पर्यायी रस्ता काम मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा महसूल विभागाला पत्र व्यवहार करून कळविले, परंतु अद्याप पावेतो न्याय मिळालेला नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापर्यंत न्याय द्यावा अन्यथा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना शेतकरी ज्ञानेश्वर महल्ले, अशोक महल्ले व गणेश महले यांनी दिले आहे.