नागरदेवळे मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांची दगडफेक; प्राजक्त तनपुरे यांचा आरोप Pudhari
Published on
:
21 Nov 2024, 4:59 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:59 am
Rahuri News: राहुरी विधानसभा मतदारसंघात नागरदेवळे (ता. नगर) येथे मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एका व्यक्तीविरुद्ध दुबार मतदानाचा आक्षेप नोंदविला. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रावर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला.
नागरदेवळे (ता. नगर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गावठाण) येथे 281 ते 284 बुथवर बोगस मतदान सुरू असल्याची माहिती आमदार तनपुरे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रावर धाव घेतली.
तनपुरे यांच्या मतदान प्रतिनिधीने एक व्यक्ती दुबार मतदान करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आमदार तनपुरे यांनी विहीत नमुन्यात अर्ज करून आक्षेप नोंदविला. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर जमले. काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर दगडफेक केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सौम्य लाठीमार केल्यावर जमाव पांगला. त्यानंतर आमदार तनपुरे मतदान केंद्राबाहेर पडले.
निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने शांततेत पार पडावी, अशी अपेक्षा अखेर फोल ठरली. नागरदेवळे येथे दुबार मतदारावर आक्षेप नोंदविला तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर घोषणाबाजी केली. मतदान केंद्रावर दगडफेक केली. या घटनेचा मी निषेध करतो.
- प्राजक्त तनपुरे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.