जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा सामना रंगला.pudhari file photo
Published on
:
21 Nov 2024, 10:56 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:56 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यामधील 11 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (दि.20) मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सायंकाळी 5पर्यंत जळगाव जिल्ह्यात 54.69 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदानाची टक्केवारी आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक 60.77 तर जळगाव शहर मतदारसंघात सर्वात कमी 45.11 टक्के मतदान झाले.
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघांसाठी सकाळी 7 पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी 20ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे दुपारी 1पर्यंत बंद झाले होते. मात्र तत्काळ त्याचे निरसन करण्यात आले सायंकाळी 6 नंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एरंडोल तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बूथ क्रमांक 214 वर दुपारी, तर जामनेर येथील निमखेडी पिंपरी मुक्ताईनगर तालुक्यातील भांडुगुरे या ठिकाणी मतदारांचा शुकशुकाट होता त्यामुळे अधिकारी व कर्मचारी निवांत बसलेले होते. वडगाव या ठिकाणी मतदार येत नसल्याने अधिकारी व कर्मचारी बसून होते. सायंकाळी 6 नंतर पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, रावेर, जळगाव सिटी, भुसावळ, चोपडा या मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. काही ठिकाणी पोलिस यंत्रणेला हस्तक्षेप करावा लागला.
सायंकाळी 5 पर्यंतची विधानसभानिहाय टक्केवारी
अमळनेर- 55.10, भुसावळ- 52.44, चाळीसगाव - 56.05, चोपडा- 52.13, एरंडोल- 58.36, जळगाव शहर- 45.11, जळगाव ग्रामीण- 60.77, जामनेर- 60.77, मुक्ताईनगर- 59.69, पाचोरा- 46.10, रावेर- 62.50 असे एकूण 54.69 टक्के मतदानाची नोंद सायंकाळी 5 पर्यंत झाली आहे.
परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी मतदानापासून वंचित
विद्यापीठामधील एफवायबीएमएस व एम.कॉम व इतर शाखांच्या परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाता आले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी मतदान करण्यापासून वंचित राहिले.
या लढतींकडे राज्याचे लक्ष
जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, मुक्ताईनगर व जामनेर या लढतीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागलेले आहे. जळगाव ग्रामीणमध्ये माजी व आजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत आहे. मुक्ताईनगर या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, तर शिवसेनेचे व विद्यमान अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये सहा वेळचे विजेते गिरीश महाजन यांना भाजप सोडून गेलेले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सहभागी झालेले प्रा. दिलीप खोडपे यांनी आव्हान दिले आहे.