राहुल गांधींच्या टीकेवर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पलटवार केला आहे.
Published on
:
21 Nov 2024, 2:07 pm
Updated on
:
21 Nov 2024, 2:07 pm
नवी दिल्ली : भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि त्यातून अब्जावधी रुपये गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर केला आहे. यावर राहुल गांधी यांनी गौतम अदाणींच्या अटकेची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपने राहुल गांधींच्या टीकेवर पलटवार केला असून भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ज्या राज्यांनी सौर ऊर्जा करारासाठी अदानी समूहाकडून कथितपणे लाच घेतल्याचे अमेरिकेच्या आरोपपत्रात नमूद केले आहे, त्या राज्यांवर विरोधी पक्षांची सत्ता होती. तसेच, राहुल गांधींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही संबित पात्रा यांनी केला.
संबित पात्रा म्हणाले की, अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद केलेल्या चार राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री नव्हता. हे प्रकरण जुलै २०२१- फेब्रुवारी २०२२ दरम्यानचे आहे. चार राज्यांच्या राज्य वितरण कंपन्यांशी वीज खरेदीच्या कराराचा आहे. त्यात एक भारतीय, एक अमेरिकन कंपनी आणि चार राज्यांचा समावेश आहे. त्यावेळी ही सर्व राज्ये एकतर काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांची होती आणि भाजपची नाही. पात्रा यांनी राहुल गांधींचे स्वागत केले. जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत या राज्यांवर राज्य करणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यात यावी, असे सांगत चौकशीची मागणी केली.
''आई-मुलगा जामिनावर बाहेर''
राहुल गांधींवर ताशेरे ओढत पात्रा म्हणाले की, भारतावर आणि देशाचे रक्षण करणाऱ्या संरचनेवर हल्ला करणे ही विरोधी पक्षांची नेहमीची खेळी आहे. राफेलचा मुद्दा २०१९ मध्ये राहुल गांधींनी अशाच पद्धतीने उचलून धरला होता. मोठा खुलासा होईल, असा दावा त्यांनी केला होता. कोविड महामारीच्या काळात ते लसीबाबत अशाच पद्धतीने पत्रकार परिषद घ्यायचे, असे संबित पात्रा म्हणाले. काँग्रेस न्यायपालिकेचे काम करत असल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर पात्रा यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस राहूल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत यावर भर दिला.