Published on
:
21 Nov 2024, 6:27 pm
Updated on
:
21 Nov 2024, 6:27 pm
नागपूर : आता आलेले एक्झिट पोल आहेत. हे काही 'एक्झॅक्ट' पोल नाहीत, त्यामुळे २३ तारखेची वाट पाहा. मी यावर जास्त भाष्य करणार नाही, खासगी कंपन्या काम करत असतात. त्यांचे अंदाज वर्तवत असतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात १६५ जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आम्ही सत्ता स्थापन करू, असा दावा विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार? यावर निर्णय घेतील. माध्यमातून प्रश्न विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांच्या तोंडून काही शब्द निघाला असेल मात्र आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे कधीच म्हटलं नाही असेही ते म्हणाले.
लाडकी बहिण फायदेशीर ठरणार का, यावर बोलत असताना दहा वर्षानंतर पहिल्यांदा भाऊबीज केली. दहा वर्षात कधी भाऊबीज केली नाही. महागाई वाढली असून दीड हजारात काय होणार? हे आमच्या लाडक्या बहिणीला माहित आहे.. आम्ही गृहलक्ष्मी योजनेद्वारे ३ हजार खात्यात टाकणार आहोत. त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केलं असून त्याचा आम्हालाच फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.