Published on
:
21 Nov 2024, 11:43 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:43 pm
बेळगाव : प्रेमात अडथळा ठरणार्या पतीच्या खुनाची सुपारी देत त्याला घराबाहेर झोपवून त्याचा नियोजनबद्धरीत्या खून केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर येथे उघडकीस आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनाप्रकरणी पत्नीसह तिघांना गुरुवारी बैलहोंगल पोलिसांनी अटक केली.
निंगाप्पा अरवळ्ळी असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. नीलम्मा निंगाप्पा अरवळ्ळी (वय 35, रा. वण्णूर), महेश गुळण्णवर (वय 27, रा. वण्णूर) आणि यल्लाप्पा कोनेन अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
नीलम्मा गावापासून काही अंतरावरील जगनीहाळ येथे धर्मस्थळ स्वसहाय संघात कामाला जात होती. या ठिकाणी तिची ओळख महेश याच्याशी झाले. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध फुलले. याची कुणकुण नीलम्माचा पती निंगाप्पाला लागली. यानंतर तो सातत्याने दारू पिऊन पत्नीशी भांडण काढू लागला.
पत्नीकडूनच पतीच्या खुनाची सुपारी
ज्या ठिकाणी धर्मस्थळ स्वसहाय संघाचे कार्यालय होते, त्याचा मालक यल्लाप्पा कोनेन याला नीलम्माने पती त्रास देत असून त्याचा काटा काढायचा आहे, असे सांगितले. ही सर्व चर्चा चार महिन्यांपूर्वी झाली होती. यल्लाप्पाने साडेतीन लाख रूपये लागतील, असे सांगितले. परंतु, हा सौदा दिड लाखाला ठरला. यापैकी 70 हजार रूपये यल्लाप्पाला आगाऊ देऊन खुनाचे नियोजन केले.
17 नोव्हेंबररोजी रात्री निंगाप्पा हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. परंतु, आधीच झालेल्या नियोजनानुसार नीलम्माने त्याला घराबाहेरील कट्ट्यावर झोपवले. यानंतर यल्लाप्पाला माहिती दिली. रात्रीच्या वेळी यल्लाप्पा विळा घेऊन आला व निंगाप्पाचा गळा चिरून निघून गेला. या प्रकरणी बैलहोंगल पोलिसांनी नीलम्मा, यल्लाप्पा व महेश या तिघांना अटक केली आहे.
एकच घाव, मेंदूची शीर निकामी
यल्लाप्पाने खुनाची पूर्वतयारी केली होती. रात्री बारानंतर निंगाप्पा झोपलेल्या ठिकाणी यल्लाप्पा गेला. त्याने गळ्यावर विळ्याने एकच वार केला. हा वार वर्मी होता. एकाच घावात निंगाप्पा जागेवरच गतप्राण झाला. अशा प्रकारे मृत्यू होतो का, असे पोलिसांना डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या घावात मान आणि मेंदू यांना जोडणारी शीर तुटल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.