देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? संजय राऊतांचा सवाल

6 hours ago 1

“अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी त्यांचे काय ते भोगतील. त्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. त्यांची संपत्ती, जागतिक रँकिंग वगैरे घसरले. तो त्यांचा प्रश्न, परंतु या प्रकरणामुळे संपूर्ण शेअर बाजाराला जो तडाखा बसला आणि सामान्य गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपये एका क्षणात वाया गेले. ते नुकसान कसे भरून निघणार? तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तुमचे अदानीप्रेम देशाच्या मुळावर उठले आहे. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.

संजय राऊत काय म्हणाले?

“पंतप्रधान मोदी यांचे परममित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप होणे हा काही नवीन विषय नाही. मोदी सरकारने धारावीपासून एअरपोर्टपर्यंत, खाणींपासून मोठय़ा पायाभूत प्रकल्पांपर्यंत सगळेच अदानींना विकले आहे. परदेशांमधील कंत्राटेदेखील अदानी यांनाच मिळावीत यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतात असेही आरोप झालेच आहेत. मात्र आता अदानी यांच्यावर थेट अमेरिकेत लाचखोरीचे आरोप झाले आहेत.

अमेरिकेत सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर सात जणांनी भारतीय अधिकाऱयांना दोन हजार कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असे हे आरोप आहेत. त्यासंदर्भात अदानी यांच्याविरोधात वॉरंटदेखील काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. थेट अमेरिकी न्याय विभागानेच हे आरोप केले असल्याने अदानी समूह, मोदी सरकार आणि अदानी यांचे उठताबसता ‘वकीलपत्र’ घेणारा भाजप यांच्यात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. अपेक्षेप्रमाणे अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यासंदर्भात खुलासा केला आहे. अदानी समूहाने काही खुलासा करणे एकवेळ समजून घेता येईल, परंतु भाजपने यात घेतलेली उडी म्हणजे अदानी-भाजप ‘हितसंबंधां’चा उघडउघड ‘वकालतनामा’च आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.

मोदी सरकारला किती वेदना होतात ते पाहावे लागेल?

“अर्थात, हे आरोप झाले आहेत अमेरिकेतील न्यायालयात आणि ते केले आहेत तेथील न्याय विभागाने. त्यामुळे भाजपवाल्यांनी त्यांच्या प्रिय अदानींसाठी भारतात केलेली फडफड आणि तडफड वायाच जाईल. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग प्रकरणात चौकशीचा फार्स भारतात असल्याने मोदी आणि त्यांच्या सरकारला अदानी यांना वाचविणे शक्य झाले होते. त्या प्रकरणात ना ‘सेबी’च्या तत्कालीन अध्यक्षा माधवी बूच आणि त्यांच्या पतीवर काही कारवाई झाली होती ना अदानी समूहावर. मात्र आता ‘आरोपीचा पिंजरा’ अमेरिकेतील न्यायालयामधील आहे. त्यामुळे तेथील ‘हातोडय़ा’ने अदानी यांना किती मोठे ‘टेंगूळ’ येते आणि त्याच्या वेदना मोदी सरकारला किती होतात, हे पाहावे लागेल”, असाही टोला संजय राऊतांनी लगावला.

मुळात अदानी, लाचखोरीच्या माध्यमातून त्यांनी मिळविलेली देश-परदेशातील कोटय़वधींची कंत्राटे आणि त्यासाठी त्यांना होणारी मोदी सरकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत या एकाच नाण्याच्या ‘तीन बाजू’ आहेत. या तिन्ही बाजू जर अमेरिकन न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या तर त्यामुळे जगासमोर देशाची मान खाली झुकेल, त्याला जबाबदार कोण? अदानींना काही शिक्षा झाली तर ते त्यांच्या पापाचे फळ असेल, परंतु तुमच्या अदानीप्रेमामुळे आज देशावर डाग लागला आहे. एका उद्योगपतीवरील प्रेमापोटी तुम्ही देशाच्या इभ्रतीचाही जो ‘व्यवहार’ केला तो अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमचे अदानीप्रेम देशाच्या मुळावर उठले आहे. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल संजय राऊतांनी केला.

“देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली”

“अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला. आपल्याकडचे स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे मात्र कायम अदानींना पाठीशी घालत आले. अदानी त्यांचे काय ते भोगतील. त्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले. त्यांची संपत्ती, जागतिक रँकिंग वगैरे घसरले. तो त्यांचा प्रश्न, परंतु या प्रकरणामुळे संपूर्ण शेअर बाजाराला जो तडाखा बसला आणि सामान्य गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपये एका क्षणात वाया गेले. ते नुकसान कसे भरून निघणार? तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची? अमेरिकेतील प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे. अदानी यांची ‘सावली’ बनलेले पंतप्रधान मोदी त्याचे काय प्रायश्चित्त घेणार आहेत?” असेही संजय राऊत म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article