विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. file photo
Published on
:
22 Nov 2024, 5:20 am
Updated on
:
22 Nov 2024, 5:20 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. शनिवारी (दि.२३) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतदार राजाने कोणाला कौल दिला, हे निकालातून स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २१) सर्वच मतदारासंघांतील उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निकालाचा अंदाज बांधला. अनेकांनी आपल्या कुटुंबियांसोबत संवाद साधत रमण्याचा प्रयत्न केला तर काहींनी देवदर्शन करत विजयाचे साकडे घातले.
नाशिक मध्य मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सकाळी देवदर्शन केल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे आराम करण्याची संधी मिळाली नव्हती. काहीवेळ आराम करत कुटुंबाशी त्यांनी चर्चा केली. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांनी देखील आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांशी चर्चा करत विजयाचा अंदाज बांधला. नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी आपल्या नातेवाईकांच्या गाठीभेटी घेत दिवस आनंदात साजरा केला. निवडणुकीच्या प्रचाराच्या एेन धामधुमीत दिवाळी आल्याने नातेवाईकांशी चर्चेसाठी उसंत मिळाली नव्हती आता मतदान झाल्यानंतर हिरे यांनी आपल्या नातेवाईकांचे घर गाठत मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतला. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर मतमोजणीचे नियोजन करण्यात व्यस्त होते. गेल्या काही दिवसात कुटुंबावर झालेल्या आघातावरही त्यांनी एकत्र बैठक घेत चर्चा केली. कार्यकर्त्यांचीही ख्याली जाणून घेतली. दिनकर पाटील यांनी सकाळच्या सत्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर दुपारी वज्रेश्वरी येथे जाऊन देवदर्शन करत विजयाचे साकडे घातले.
नाशिक पूर्व मतदारसंघात मतदानाच्या काही दिवस अगोदरपासून वातावरण तणावपूर्ण होते. प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर अंगावर धावून जाण्याचे बाचाबाचीचे प्रकार घडले होते. त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांनी काही काळ आराम केला. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करत विजयाचा अंदाज बांधला. महायुतीचे उमेदवार भाजप आमदार अॅड. राहुल ढिकले हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त दिसले. कार्यकर्त्यांच्या भेटी, कार्यालयात येणाऱ्या आगंतुकांशी त्यांनी चर्चा केली. कार्यकर्ते हेच आपले कुटुंब असल्याचे सांगत विजयोत्सवाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत मतदारसंघात झालेल्या मतदानाचा आढावा घेतला. निकालाच्या एक दिवस अगोदर अर्थात शुक्रवारी (दि.२२) त्यांनी कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. गेल्या महिना-दीड महिन्यांपासून अविरत सुरू असलेल्या प्रचारदौऱ्यांमुळे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार योगेश घोलप यांना कमालीचा थकवा आला आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. कार्यकत्यांशी चर्चा करत मतमोजणीचे नियोजन देखील त्यांनी केले.