Published on
:
22 Nov 2024, 10:41 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:41 am
2009 मध्ये अस्तित्त्वात आलेल्या 145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघात 2009, 2014, 2019 मधील प्रत्येक निवडणुकीत मिरा-भाईंदरकर मतदारांनी नवीन उमेदवाराला संधी दिल्याचा इतिहास आहे. यंदा पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांकडून नवीन उमेदवाराला संधी दिली जाणार कि, मागील निवडणुकीच्या अनुषंगाने संधीची पुनरावृत्ती होणार, हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
2009 पूर्वी मिरा-भाईंदर शहराचा नवी मुंबईतील 54 बेलापूर विधानसभा मतदार संघात समावेश होता. त्यावेळी या मतदार संघाचे आमदार म्हणून गणेश नाईक होते. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा मतदार संघांचे 2009 मध्ये विभाजन केल्यानंतर 145 मिरा-भाईंदर व 146 ओवळा-माजिवडा मतदार संघ उदयास आले. 146 ओवळा-माजिवडा मतदार संघात मिरा-भाईंदर शहराचा सुमारे 40 टक्के भाग समाविष्ट होत असून उर्वरीत भाग 145 मिरा-भाईंदर मतदार संघात समाविष्ट होतो. या मतदार संघाची पहिली निवडणूक 2009 मध्ये पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोन्सा विजयी झाले होते. त्यांना 62 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेदवार नरेंद्र मेहता यांचा 10 हजार 604 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा गिल्बर्ट मेंडोन्सा विरुद्ध नरेंद्र मेहता यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यावेळी मतदारांनी गिल्बर्ट यांना नाकारून विजयाची माळ मेहता यांच्या गळ्यात घातली. मेहता यांना त्यावेळी 91 हजार 468 मते मिळाली होती. त्यांनी गिल्बर्ट यांचा 32 हजार 292 मतांनी पराभव केला होता. 2019 मधील तिसर्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन व अपक्ष उमेदवार गिता जैन यांच्यात तिरंगी लढत झाली.
2012 मधील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कॅटलीन परेरा महापौर पदावर विराजमान झाल्या होत्या. 2015 मध्ये मेहता यांनी आघाडीत फूट पाडून पालिकेची सत्ता काबीज केली. त्यावेळी महापौर पदाचा वाद निर्माण झाला होता. या पदासाठी गिता जैन इच्छुक होत्या. जैन यांच्या मनसुब्याला धक्का देत मेहता यांनी आपली भावजय डिंपल मेहता यांना महापौर पदावर विराजमान केले. यानंतर मेहता व जैन यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याचा वचपा काढण्यासाठी जैन यांनी 2019 मधील विधानसभा निवडणूक मेहता यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याच्या ईर्ष्येने लढविली. तत्पूर्वी त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जंगजंग पछाडले होते. मात्र त्यात त्यांना यश न येता उमेदवारी मेहता यांना देण्यात आली. यामुळे विजयाच्या भावनेने पेटलेल्या जैन यांना अखेर या निवडणुकीत यश आले आणि त्या विजयी झाल्या. त्यांना 79 हजार 575 मते मिळाली होती. त्यांनी मेहता यांचा 15 हजार 526 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांना 55 हजार 937 मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट वाचले होते.
2009 ते 2019 दरम्यानच्या तिन्ही निवडणुकीत मिरा-भाईंदरकर मतदारांनी नवीन उमेदवाराला संधी दिल्याचा इतिहास कोरला असला तरी 2024 मधील निवडणुकीत मतदार नवीन उमेदवाराला संधी देतील कि संधीची पुनरावृत्ती घडवतील, हे येत्या 23 नोव्हेंबर रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा भाजप-राष्ट्रवादी (एपी)-शिवसेना (शिंदे) महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता, काँग्रेस-राष्ट्रवादी (एसपी)-शिवसेना (उबाठा) व इतर पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन व अपक्ष उमेदवार गिता जैन एकमेकांसमोर उभे राहिले. यावेळी सुद्धा जैन यांनी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. यंदाही त्यांना त्यात यश आले नाही आणि उमेदवारी मेहता यांना देण्यात आली. यामुळे यंदाची निवडणूक मेहता विरुद्ध जैन यांच्या व्यक्तिगत जय-पराजयाची ठरल्याचे चित्र पहायला मिळाले. यंदाच्या निवडणुकीत एकूण 5 लाख 10 हजार 862 मतदारांपैकी 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानावेळी 2 लाख 64 हजार 354 मतदारांनी मतदान केले. एकूण 51.76 टक्के झालेल्या मतदानात 1 लाख 37 हजार 928 महिला तर 1 लाख 26 हजार 426 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर यंदाच्या निवडणुकीत 5 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली असली तरी त्यातील एकही मतदाराने मतदान केले नाही. यंदाची निवडणूकीतील प्रचारात कोणत्याही शासकीय योजनेचा तसेच शहरातील प्रभावी विकासाचा मुद्दा आणला गेला नाही. तर धर्म व एकमेकांची उणीधुणी काढण्याच्या मुद्याला प्रचारात महत्व दिले गेले. यंदाची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने तिन्ही उमेदवारांनी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही.
तत्पूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपासून केंद्रातील भाजप नेत्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण न देण्यासह त्यांच्या जिहादचा मुद्दा जगजाहीर केला. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील मुस्लिम बहुल क्षेत्रातील मतदारांनी महायुतीला मते न देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर यांना मिळाल्याचे बोलले जात असले तरी यंदाच्या निवडणुकीत मिरा-भाईंदरकर मतदार मुझफ्फर या नवीन उमेदवाराला संधी देतील कि आमदारकीचा उपभोग घेतलेल्या मेहता किंवा जैन यांना विजयी मते देऊन संधीची पुनरावृत्ती घडवतील, हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.