देशांतर्गत बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स आज २ हजार अंकांनी वाढला. (file photo)
Published on
:
22 Nov 2024, 10:38 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:38 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक संकेतादरम्यान आज शुक्रवारी (दि.२२) भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. देशांतर्गत बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स २ हजार अंकांनी वाढला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने ५८० अंकांनी वाढून २३,९०० वर मजल मारली. त्यानंतर सेन्सेक्स १,९६१ अंकांनी वाढून ७९,११७ वर बंद झाला. तर निफ्टी ५५७ अंकांच्या वाढीसह २३,९०७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ ही अनुक्रमे २.५ टक्के आणि २.३ टक्के एवढी राहिली.
बाजारातील आजच्या जोरदार तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७ लाख कोटींनी वाढून ४३२.५७ लाख कोटींवर पोहोचले.
बाजारात आज नेमकं काय घडलं?
अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स घसरणीतून सावरले, हिरव्या रंगात बंद.
Nifty PSU Bank निर्देशांक ३ टक्के वाढला.
सेन्सेक्स १,९६१ अंकांनी वाढून ७९,११७ वर बंद.
निफ्टी ५५७ अंकांच्या वाढीसह २३,९०७ वर स्थिरावला.
सेन्सेक्स- निफ्टीची आजची वाढ ही अनुक्रमे २.५ टक्के आणि २.३ टक्के.
पाच महिन्यांच्या निचांकीवरून बाजार सावरला
विशेष म्हणजे मागील गुरुवारच्या सत्रातील पाच महिन्यांच्या निचांकीवरून आज शुक्रवारी शेअर बाजार सावरला. अमेरिकेच्या श्रमिक बाजारातील मजबूत स्थितीचे सकारात्मक पडसाद बाजारात दिसून आले. तसेच खरेदीदारांनी कमी मूल्यांकनाच्या संधीचा फायदा घेतल्याने बाजारात रिकव्हरी दिसून आली.
प्रमुख क्षेत्रात चौफेर खरेदी
आज प्रमुख क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. निफ्टी पीएसयू बँक, आयटी आणि रियल्टी प्रत्येकी ३ टक्के वाढले. निफ्टी बँक, फायनान्सियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, मेटल, हेल्थकेअर, ऑईल आणि गँस १ ते २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप १.२ टक्के आणि स्मॉलकॅप ०.९ टक्के वाढून बंद झाला.
अमेरिकेतून आली चांगली बातमी, आयटी शेअर्स तेजीत
अमेरिकेतील श्रमिक बाजारातील मजबूत डेटामुळे आयटी शेअर्स वधारले. निफ्टी आयटी २ टक्के वाढला. अमेरिकेतील बेरोजगाराचे दावे कमी झाले आहेत. यातून नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयटी शेअर्स वधारले.
अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये रिकव्हरी
दरम्यान, अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये रिकव्हरी दिसून आली. आज सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव कायम राहिला होता. एनएसईवर अदानी ग्रीन एनर्जीचा (Adani Green Energy share price) शेअर्स सर्वाधिक ११ टक्के घसरून १,०२१ रुपयांपर्यंत खाली आला होता. अदानी सोल्यूशन्स, अदानी एंटरप्रायजेस (Adani Enterprises shares), अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांच्या घसरणीसह खुले झाले होते. पण हे शेअर्स दुपारच्या व्यवहारात घसरणीतून सावरले. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स २.५ टक्क्यांनी वाढला. तर अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.
सेन्सेक्सवर एसबीआय, बजाज फायनान्स, टायटन हे शेअर्स ४ टक्के वाढीसह टॉप गेनर्स राहिले. त्याचबरोबर आयटीसी, टीसीएस, एलटी, रिलायन्स, एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस हे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले.
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत
अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक काल उच्चांकी पातळीवर बंद झाले होते. आशियाई बाजारातील निर्देशांकही आज वाढले. जपानचा निक्केई निर्देशांक दोन दिवसांच्या घसरणीनंतर सावरला आणि तो वधारुन बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पीही ०.८ टक्के वाढून बंद झाला.