बंगळूर : तिप्पेस्वामी यांच्या निवासस्थानी सापडलेले सोन्याचे दागिने आणि चांदीचे पूजा साहित्य.Pudhari File Photo
Published on
:
21 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:46 pm
बंगळूर : लोकायुक्तांनी गुरुवारी (दि. 21) सकाळी चार अधिकार्यांच्या बंगळूर, मंगळूरसह विविध ठिकाणच्या निवास, कार्यालये अशा 25 ठिकाणी छापे घातले. त्यांच्याकडे असणार्या बेहिशेबी मालमत्तेबाबत तपास केला. गेल्या दहा दिवसांत लोकायुक्तांनी दुसर्यांदा कारवाई केली.
येथील टाऊन प्लॅनिंगचे संचालक तिप्पेस्वामी यांच्या बनशंकरी तिसर्या फेजमधील विश्वेश्वरय्या रोडवरील निवासावर लोकायुक्तांनी छापा टाकला. त्या ठिकाणी कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने सापडले. ही मालमत्ता पाहून अधिकारी दंग झाले. 23 सोनसाखळ्या, 28 जोडी कर्णफुले, मोत्यांचे हार, विविध प्रकारचे नेकलेस, अंगठ्या, 8 लाख रुपये रोख, चांदीचे ताट, देवपूजेचे साहित्य महागडी ब्रँडेड घड्याळे असा ऐवज त्यांच्याकडे दिसून आला. कनकपूर रोडरवरील अबकारी खात्याचे जिल्हा पोलिसप्रमुख मोहन के. यांच्या घरावर सकाळी 6 वाजता छापा टाकण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या निवासात तपास सुरु होता. काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याची माहिती मिळाली आहे.
कावेरी पाणीपुरवठा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महेश यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकण्यात आला. मंड्यातील मळवळ्ळीतील महेश यांच्या घरातही तपास करण्यात आला. मंगळुरातील मेलेन्सियानजीकच्या फ्रेड रोज एन्क्लेव्ह या त्यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आला. मंगळूर आणि चिक्कबळ्ळापुरातील लोकायुक्त अधिकार्यांनी यामध्ये भाग घेतला. तीन वाहनांतून आलेल्या अधिकार्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत तपास केला. मल्लिकट्टेनजीकच्या कार्यालयावरही छापा घातला. मंड्या लोकायुक्त एस.पी. सुरेश बाबू यांनी नेतृत्व केले. महेश यांच्या म्हैसूर आणि बंगळुरातील घरासह सात ठिकाणी छापे घालण्यात आले. त्यांचे सासरे कृष्णन यांच्या निवासातही तपास करण्यात आला. खाण आणि भूविज्ञान खात्याच्या वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ एम. सी. कृष्णवेणी यांच्या चिक्कबळ्ळापूर येथील घरावर छापा घालून बेहिशोबी मालमत्तेची तपासणी करण्यात आली.
12 नोव्हेंबर रोजी लोकायुक्तांनी बेळगावसह विविध जिल्ह्यांमधील चाळीस ठिकाणी छापे घातले होते. त्यावेळी एकूण 22.5 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड केली होती. लोकायुक्तांनी गुरुवारी केलेली दहा दिवसांतील दुसरी कारवाई आहे. त्याआधी जुलै महिन्यात छापे घालण्यात आले होते. 12 अधिकार्यांच्या निवास आणि कार्यालय अशा अनेक ठिकाणी एकाचवेळी तपास सुरु करण्यात आला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली होती.