विधानसभा निवडणुक काळात राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिस यंत्रणा सतर्कतेने पहारा देत होती.Pudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 6:01 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:01 am
नाशिक : राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. शनिवारी (दि.२३) मतमोजणी होऊन महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समर्थकांनी जल्लोष केला, तर महाविकास आघाडीचे समर्थक निराश झाले.
अनपेक्षित निकाल लागल्याने महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पाहावयास मिळाली. मतमोजणी केंद्रांवरून ते दुपारीच माघारी फिरल्याने तेथे वादाचे प्रसंग झाले नाही. त्यामुळे पोलिसांनाही दिलासा मिळाला. विजयी मिरवणुकाही शांततेत झाल्याने पोलिसांनी नि:श्वास सोडला. त्यानंतर पोलिस यंत्रणेने काहीसा मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र बंदोबस्तासह गुन्हेगारांवर कारवाई केली. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या, रजा बंद करण्यात आल्या. त्यामुळे सतत महिनाभर पोलिसांनी सेवा बजावली. सतत कामावर असल्याने पोलिसांना शारीरिक व मानसिक थकवा आला. मात्र तरीदेखील त्यांनी नेटाने बंदोबस्त करीत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली. शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त केला. त्यात नाकाबंदी, वाहन तपासणीसोबतच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हेगारांची धरपकड करणे, नियमित गुन्ह्यांची उकल करणे ही कामे पोलिसांनी केली. मतदानाच्या दिवसापर्यंत पोलिस बंदोबस्त कायम होता. तर मतमोजणीच्या दिवशीही स्ट्राँगरूमभोवती व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. तसेच पक्ष कार्यालय, उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालय येथेही पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. मतदानाआधी शहरातील पंचवटी व अंबड परिसरात दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये पैसेवाटपावरून वाद झाले होते. तर नांदगाव येथे मतदानाच्या दिवशी दोन उमेदवारांमध्ये वाद झाला हाेता. त्यामुळे मतमोजणीच्या वेळी हा वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियाेजन करीत प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे समर्थक समोरासमोर येणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेतली होती.
निकालानंतर नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची मिरवणूक काढण्यात आली. जुने नाशिकमधील दूधबाजार परिसरातूनही ही मिरवणूक जात असल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला. तसेच काही मिनिटांत ही मिरवणूक पुढील परिसरात नेली. चोख पोलिस बंदाेबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच इतर ठिकाणच्या मिरवणुकांमध्येही पोलिसांनी हीच खबरदारी घेतली.
घोषणाबाजी, सोशल मीडियावर लक्ष
निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रासह परिसरात जल्लोष केला. समर्थकांनी दिलेल्या घोषणाबाजीवरही पोलिसांनी लक्ष ठेवले होेते. त्याचप्रमाणे सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवले. कोणती आक्षेपार्ह पोस्ट, प्रतिक्रिया नाही याची पाहणी केली. तसेच पोलिसांनी समर्थकांमध्ये मिसळून अंदाज घेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.
विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. शहर पोलिस दलासोबत बंदोबस्तासाठी परजिल्हा, परराज्यातून आलेले पोलिस, होमगार्ड यांच्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच उमेदवारांनीही आचारसंहितेचे पालन करीत पोलिसांना सहकार्य केले. तर नागरिकांनीही निवडणूक काळात सहकार्याची भूमिका ठेवल्याने निवडणुका शांततेत झाल्या.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.