Published on
:
25 Nov 2024, 6:03 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:03 am
शिवसेनेची झालेली दोन शकले आणि महायुतीतीलच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या अपक्ष उमेदवाराने उभे केलेले आव्हान अशी कठीण परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली मतांची विभागणी तथा घटलेले मतदान हे भरून काढण्यात आमदार महेंद्र थोरवे हे यशस्वी झाले असून त्यांनी तब्बल 94 हजार 511 मते मिळवत दुसर्यांदा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. थोरवेंच्या या यशात मागील वर्षी भाजपात प्रवेश केलेले म्हणजेच महायुतीतील घटक असलेले माजी आमदार सुरेश लाड यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले आहे. 2019 मध्ये जेव्हा प्रथमच महेंद्र थोरवे हे कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून विजयी झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांची एकच शिवसेना अस्तित्वात होती. तसेच त्यावेळेस थोरवे यांना शेकाप आणि अन्य छोटा पक्षांचाही पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे एक लाख दोन हजार मते मिळून महेंद्र थोरवे त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांचा पराभव करून विधानसभेवर पोहोचले होते.
मात्र या वेळची म्हणजेच 2024 ची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मागील अडीच वर्षाच्या राजकीय घडामोडीत दोन शकले झाली. ती म्हणजे एक गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदे गटाची बाळासाहेब ठाकरे शिवसेना. त्यामुळे साहजिकच महेंद्र थोरवे यांचे शिवसेनेचे मताधिक्य निम्मे निम्मे विभागले जाणार हे निश्चित मानले जात होते. आणि प्रत्यक्षात तसे झाले सुद्धा. उबाठा गटाचे उमेदवार नितीन सावंत यांनी 48 हजार 736 मते मिळवली. तसेच यावेळेस महेंद्र थोरवे यांना शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे यांचा पाठिंबा मिळाला नाही तर याउलट महायुतीतील अजित पवार गटातील सुधाकर घारे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी सर्व पदाधिकार्यांनी समवेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली. तसेच घारे यांनी राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून पक्षाचा पाठिंबा असल्याचे पत्रही मिळवले. याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी झाले एकंदरच हे सर्व पाहता महेंद्र थोरवे हे 2019 च्या तुलनेत आता फक्त भाजप आणि आरपीआय या दोघांच्या साथीने विधानसभेची निवडणूक लढवत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
त्यातच नाराज असलेले महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपमधील नेते किरण ठाकरे यांनीही उमेदवारी अर्ज सादर करून थोरवे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. अखेरच्या क्षणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यावर किरण ठाकरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र तरीसुद्धा काही नाराज असलेले भाजप कार्यकर्ते महेंद्र थोरवे यांना खरोखरच कितपत निवडणुकीत मतदान करतील तथा मदत करतील अशी शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करीत होते . यावर भाजप ने आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकत महेंद्र थोरवे यांच्या मागे उभी केली असल्याचे सांगितले. त्यामुळे हे सर्व मुद्दे लक्षात घेता या वेळची विधानसभेची निवडणूक महेंद्र थोरवे यांच्यासाठी मोठी कठीणच परिस्थिती होती. मात्र याही परिस्थितीत महेंद्र थोरवे हे जराही न डगमगता ते आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेले.
मागील अडीच वर्षाच्या कालावधीत कर्जत मतदारसंघात दोन हजार कोटींपेक्षा अधिक ची विकास कामे आणण्यात थोरवे यांना यश आले होते.त्यामुळे जनता त्यांच्या या विकास कामांवर खुश होती. त्यामुळे या विकास कामांच्या जोरावर मतदार आपल्याला नक्कीच मतदान करून निवडून देतील असा विश्वास ठेवत त्यांनी निवडणूक लढविली आणि त्यांचा हा विश्वास मतदारांनी सार्थ ठरवत कर्जत खालापूर मधील मतदारांनी सुद्धा त्यांना भरभरून मतदान केले.
त्यामुळेच शिवसेनेची दोन शकले होऊन सुद्धा आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादीच्या गटातील सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून थोरवे यांच्यासमोर उभे केलेले मोठे आव्हान सुद्धा थोरवे यांनी योग्यरीत्या परतवत कर्जत मतदारसंघावर तब्बल 94511 मते आपला विजय संपादन केला.
माजी आमदार सुरेश लाड यांची भूमिका ठरली निर्णायक
1999 पासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काम करणारे आणि आत्तापर्यंत तब्बल तीन टर्म कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून काम करणारे सुरेश लाड यांचा 2019 मध्ये पराभव झाला होता. या पराभवाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुनील तटकरे हे जबाबदार असल्याचं वक्तव्य लाड यांनी अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदेतून केलं होतं .तेव्हापासूनच त्यांनी राष्ट्रवादी पासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. अखेर दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे सुधाकर घारे यांच्याशी हि बिनसले अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यातच सुरेश लाड आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे असल्याने त्यांनी महायुतीचा धर्म पाळत प्रामाणिक काम करत उघडपणे आपला पाठिंबा महेंद्र थोरवे यांना दर्शवला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांना कर्जत प्रमाणेच खालापूर खोपोली मधील जास्तीत जास्त मते कशी मिळतील यासाठी विशेष रणनीती आखली आणि त्यात त्यांना यशही आल्याचे दिसून आले आहे . त्यामुळेच महेंद्र थोरवे यांना खालापूर खोपोलीतून शेवटच्या क्षणी चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे सुरेश लाड यांची भूमिका महेंद्र थोरवे यांच्या विजयात निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.