टायगर अभी जिंदा है; डॉ. सुजय विखे यांचा संगमनेरात इशाराPudhari
Published on
:
25 Nov 2024, 8:06 am
Updated on
:
25 Nov 2024, 8:06 am
Sangamner Politics: पराभव मान्य करा आणि इथून पुढे आमच्या एकाही माणसाला हात लावला तर ‘टायगर अभी जिंदा है!’ असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता दिला. संगमनेरच्या पठार भागासाठी उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणू, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयाच्या जल्लोषानंतर मालपाणी लॉन्स येथे डॉ. सुजय यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्य सभेत डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले, की अमोलचा विजय हा सर्वांचा असून कोणा एकट्याचे यश नाही. संगमनेरचा आमदार खताळ नसून आपण सर्व जण असणार. कोणीही आमदार म्हणायचे नाही. भाऊ म्हणून हाक मारायची आहे. आरोग्य, पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे. पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहेत. प्रत्येक वाडी-वस्तीवर आपल्याला पोहोचायचे आहे.
आजची सभा आमची शेवटची आहे, असे सांगत थोरात यांचे नाव न घेता विखे पाटील यांच्यावर टीका केली ते म्हणाले, की तुम्ही देखील पराभव मान्य करावा पण तुम्ही इथून पुढे आमच्या एकाही माणसाला हात लावला तर ‘टायगर अभी जिंदा है!’ वाघ जेव्हा शांत होतो तेव्हा कोणी खडे मारायचे नाहीत. वाघ दबक्या पावलाने पुढे जाऊन काय करतो हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे.
आमदार अमोल खताळ म्हणाले, की जनसेवेचा वसा घेतल्याने आज माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर जनतेने विश्वास टाकला. ज्यांना चाळीस वर्षांत पाणीप्रश्न सोडवता आला नाही, त्यांची दहशत वाढली होती. मात्र ही दहशत मोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. हा विजय लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यामुळे झाला आहे.