विधानसभा निवडणूकीत महायुतीला भरभरुन मतदान मिळालेले असताना मनसेला आपला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यातच माहीम येथून राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांचाही पराभव झाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण असताना आपण महायुतीमध्ये जायला हवे असे पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरेंसमोर बोलून दाखवले. तर मनसेच्या या बैठकीत राज ठाकरेंनी उमेदवारांची मतं जाणून घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. या मोठ्या पराभवानंतर मनसे पक्षाच्या नेत्यांची शिवतीर्थ येथे चिंतन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनसे नेत्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर आपली भूमिका मांडली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पराभवावर चिंतन आणि सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना आपण युतीत जायला हवे असा प्रस्ताव मांडला. आपण महायुतीत थेट सामील नसल्याने आपल्याला मतदानात महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केले नाही. जर आपण महायुतीत थेट सामील असतो तर चित्र वेगळे असते असे मत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंसमोर मांडलं. राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपशी जवळीक फायद्याची ठरली नाही, अशी उमेदवारांची मतं होती. तर बहुतांश मनसेच्या उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. यासोबतच काही ठिकाणी भाजपच्या अंतर्गत मदतीची अपेक्षा होती पण तिथे मदत झाली नाही, असं मत उमेदवारांनी व्यक्त केलं आहे.
Published on: Nov 25, 2024 03:57 PM