Published on
:
25 Nov 2024, 12:16 pm
Updated on
:
25 Nov 2024, 12:16 pm
शिरढोण : येथे जवाहर साखर कारखान्याची ऊसतोड आंदोलन अंकुश संघटनेने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बंद पाडली. येथील अजित कोईक यांच्या शेतातील ऊस तोड बंद पाडून ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोडायला या भागात परत फिरकायचे नाही, असा दम संघटनेचे धनाजी चुडमंगे व पदाधिकार्यांनी शेतकऱ्यासह ऊसतोड मजुरांना दिला.
जवाहर साखर कारखान्याच्या वतीने येथील अजित कोईक यांच्या शेतात ऊस तोडण्यात येत होता. ही माहिती आंदोलन अंकुशच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमंगे यांच्यासह राकेश जगदाळे, नागेश काळे, अनिल हुपरीकर, पप्पू मुंगळे, एकनाथ माने, महेश जाधव, संपत मोडके, रशीद मुल्ला यांनी ऊसतोड बंद पाडली. यावेळी यावेळी ट्रॅक्टर अडवून ऊस दर अद्याप जाहीर झालेले नाहीत, शेतकर्यांच्या मागणीनुसार कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केलेले नाही, तुम्ही ऊसतोड का केली? असा सवाल करत शेतकरी अजित कोईक यांना धारेवर धरले. ऊसतोड बंद करतो मात्र तोडलेला ऊस तेवढा पाठवतो अशी विनंती शेतकरी कोईक यांनी केली. दरम्यान मोठ्या प्रमाणात वादविवाद झाला. यावेळी जवाहर कारखान्याचे शिरढोण येथील कर्मचारीही उपस्थित होते.
संबंधित शेतकर्यालाही संघटनेच्या पदाधिकार्यांनी ऊसतोडीला मज्जाव केला. योग्य हमीभाव मिळाला तर वर्षभर केलेल्या मेहनतीला फळ मिळेल, दर जाहीर होण्याआधीच तोड का दिली, असा जाब विचारला. संघटनेसोबत कारखानदारांची चर्चा झालेली नसताना ऊस तोडून नेणे योग्य नाही. तोडगा निघाल्याशिवाय ऊसतोड केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.