Published on
:
25 Nov 2024, 2:43 pm
Updated on
:
25 Nov 2024, 2:43 pm
बाराहाळी : लेह मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बर्फाच्या ढिगार्याखाली अडकलेल्या हिरानगर येथील जवानास वीर मरण आल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील रहिवासी असलेले वीर जवान सुधाकर शंकर राठोड (वय- ३९,) मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी लेह मध्ये आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या अंगावर बर्फाचा ढीगारा कोसळला. या ढिगार्याखाली ते गाडले गेले. यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. ढिगार्याखाली अडकलेल्या जवानाचा तिसऱ्या दिवशी शोध लागला. जवानास उपचार करिता जम्मू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवानाची तब्येत ही गंभीर असल्या कारणास्तव त्यांच्या डोक्यावर जम्मू येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जवानाची परिस्थिती ही अतिशय नाजूक होत असल्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी चंदिगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सुधाकर राठोड या जवानास वीर मरण आले. त्यांच्या मागे पत्नी, आई, ८ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी आहे.
जवानाचे पार्थिव हे मंगळवारी पहाटे चंदीगड येथून हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे.अंतिम दर्शन दि.२७ रोजी हिरानगर येथे होणार आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.