नदीच्या पुलाखाली स्फोटके ठेवणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. Pudhari Photo
Published on
:
25 Nov 2024, 4:30 pm
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलाखाली स्फोटके दडवून ठेवणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. पांडू कोमटी मट्टामी (३५) रा.पोयारकोटी, ता.भामरागड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना १६ नोव्हेंबरला नक्षलविरोधी अभियानादरम्यान पोलिसांना पर्लकोटा नदीच्या पुलाखाली स्फोटके पुरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साह्याने ती स्फोटके निकामी केली. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संकेत नानोटी आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान आरेवाडा मार्गावर नाकेबंदी करत असताना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला. त्याची सखोल चौकशी केली असता तो पांडू मट्टामी असल्याचे लक्षात आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पर्लकोटा नदीच्या पुलाखाली १ क्लेमोर माईन आणि २ स्फोटके दडवून सुरक्षा दलाच्या जवांनाना जिवे मारुन त्यांच्याकडील शस्त्रे लुटण्याचा नक्षल्यांचा प्रयत्न होता, अशी कबुली त्याने दिली. त्यावरुन त्याला अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक(प्रशासन) एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संकेत नानोटी यांनी ही कारवाई केली.