Published on
:
25 Nov 2024, 6:25 pm
Updated on
:
25 Nov 2024, 6:25 pm
नवी दिल्ली : भाजप नेतृत्वाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. आतापर्यंत विधिमंडळ नेता निवडीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निरीक्षक नेमले नसले तरी ही जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी अमित शाह मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्याच उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. महायुतीत भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाईल. मित्रपक्षांना योग्य मानसन्मान देऊन सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला प्रमुख खाती दिली जाऊ शकतात.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावर सोमवारी रात्री दिल्लीत शिक्कामोर्तब होणार होते. त्यासाठी अमित शाह यांच्या निवासस्थानी एक बैठकीत देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील, अशा चर्चा होत्या. त्यानुसार देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखलही झाले. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि अमित शाह यांची भेट न घेता पुन्हा ते मुंबईकडे परतले.