महाराष्ट्र स्थापनेच्या 64 वर्षानंतर ‘हे’ पहिल्यांदाच घडलं, विधानसभेच्या निकालात वेगळपण

2 hours ago 1

महाराष्ट्र स्थापनेच्या 64 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपसोबत एक शिवसेना, एक राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेससोबत एक शिवसेना, एक राष्ट्रवादी अशी ऐतिहासिक निवडणूक झाली आणि निकालानं असे अनेक चित्र समोर आणले, ज्या या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा घडल्या.

महाराष्ट्र स्थापनेच्या 64 वर्षानंतर 'हे' पहिल्यांदाच घडलं, विधानसभेच्या निकालात वेगळपण

| Updated on: Nov 25, 2024 | 10:56 PM

1960 नंतर यशवंतराव चव्हाणांच्या कराडमध्ये पहिल्यांदा कमळ फुललं. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा पराभूत झाले. 39 हजार 355 मतांनी भाजपच्या अतुल भोसलेंनी त्यांना पराभूत केलं. ठाकरे घराण्यातील उमेदवाराला यंदा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पाहावं लागलं. माहिम मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी राहिले. विधानसभेच्या निवडणुकीत अमरावतीचे बच्चू कडू यंदा पहिल्यांदाच पडले. प्रहार संघटनेच्या स्थापनेपासून त्यांचा किमान एक तरी आमदार विधानसभेत पोहोचायचा. यंदा बच्चू कडूंसह त्यांचा संघटनेचा एकही व्यक्ती जिंकू शकला नाही. हितेंद्र ठाकूरांच्या वसई-विरारच्या बालेकिल्ल्याला यंदा पहिल्यांदाच सुरुंग लागला. 1990 पासून आतापर्यंत ठाकूरांचा कधीच पराभव झाला नव्हता. त्यांच्या बहुजन विकास आघाडीचे किमान २ आमदार कायम निवडून येत होते. यंदा अतिशय नवख्या आणि श्रमजीवी संघटनेत कार्यरत असणाऱ्या स्नेहा दुबे यांना भाजपनं निवडणूक काळात सदस्यत्व बनवून तिकीट दिलं. त्यांनी धक्कादायकरित्या हितेंद्र ठाकूरांना 3 हजार 153 मतांनी हारवलं. यंदा पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडीचा एकही आमदार विधानसभेची पायरी चढू शकला नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा घडलेल्या घटना

  • संगमनेरात सहकार आणि शिक्षणाचं जाळं विणणाऱ्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यंदा पहिल्यांदा पराभूत झाले. त्यांना नवख्या अमोल खताळ यांनी तब्बल 10 हजार 560 मतांनी पाडलं. अमोल खताळ यांची ओळख विखे समर्थक म्हणून होती, ऐनवेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं तिकीट घेवून तब्बल 8 टर्म आमदार असणाऱ्या काँग्रेसच्या थोरातांना पराभूत केलं.
  • 2019 ला अमरावती जिल्ह्यातल्या 8 पैकी 3 जागी काँग्रेस, दोन जागी प्रहार, दोन अपक्ष आणि फक्त एक जागा भाजपला मिळाली होती. यंदा 8 पैकी 5 जागा भाजपला, एक अपक्ष, एक अजितदादा आणि एक ठाकरे गटाला मिळाली.
  • 2019 मध्ये कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 4 जागी काँग्रेस, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 2 अपक्ष होते. भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात नव्हती. यंदा इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं स्वतःच्या 2 जागांसह आपले समर्थक असलेल्या इतर 3 उमेदवारांना निवडून आणलं. शिंदेंच्या शिवसेनेला 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. काँग्रेसला पहिल्यांदाच कोल्हापुरात एकही जागा मिळाली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही शून्य जागा मिळवल्या.
  • चंदगडमध्ये भाजप बंडखोर अपक्ष शिवाजी पाटील जिंकतील याबद्दल स्थानिक भाजप समर्थकही संभ्रमात होते. पण त्यांच्या विजयाची बातमी खुद्द फडणवीसांनीच शिंदेंना ऐकवली. पण भाजप बंडखोरानं अजितदादांचा उमेदवार पाडल्यामुळे पण माझा उमेदवार पडला म्हणून अजितदादांनी मिश्किल प्रतिक्रियाही दिली.
  • 2019 ला सातारा जिल्ह्यातल्या 8 जागांपैकी 3 जागांवर राष्ट्रवादी, एक ठिकाणी काँग्रेस, 2 शिवसेना आणि 2 जागा भाजपकडे होत्या. यंदा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच साताऱ्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.. भाजपच्या ४ जागा आल्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2, तर शिंदेंच्या शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या साताऱ्यात यंदा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही.
  • 2019 च्या निवडणुकीत नगरच्या 12 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी, २ जागांवर काँग्रेस, ३ जागांवर भाजप तर एका जागेवर अपक्ष निवडून आले होते. यंदा 5 जागांवर भाजप, 3 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, 2 जागी शिंदेंची शिवसेना आणि एक जागी काँग्रेस तर एकाच जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता आला.
  • 2019 ला धुळे जिल्ह्यातल्या 5 जागांवर दोन भाजप, एक काँग्रेस आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपनं पाच पैकी तब्बल 4 जागांवर विजय मिळवला, आणि एका जागेवर शिंदेंची शिवसेना विजयी झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला धुळे जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही.
  • 2019 ला जळगाव जिल्ह्यातल्या ११ जागांपैकी भाजप 4, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी एक तर काँग्रेस एक जागी विजयी होती. यंदा भाजप पाच, शिंदेंची शिवसेना 5 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. काँग्रेस जळगावातून हद्दपार झाली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही भोपळाही फोडता आला नाही
  • 2019 ला पालघर जिल्ह्यातल्या ६ जागांपैकी हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडीला ३, माकप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळाली होती. यंदा भाजपनं इतिहासात पहिल्यांदाच पालघरमध्ये 4 जागा मिळवल्या. माकपची एक आणि शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळाली. स्थापनेपासून पहिल्यांदाच ठाकूरांची बहुजन विकास आघाडीचं त्यांच्याच जिल्ह्यात पानिपत होवून हद्दपार झाली.
  • 2019 ला नागपूर जिल्ह्यातल्या 12 पैकी 5 जागांवर भाजप, ४ जागांवर काँग्रेस, एका जागेवर राष्ट्रवादी तर एक जागा अपक्षाकडे होती. यंदा 12 पैकी तब्बल 8 जागांवर भाजप, ३ जागांवर काँग्रेस आणि एक जागी शिंदेंची शिवसेना विजयी झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह अजित पवारांची राष्ट्रवादीही यंदा नागपुरातून हद्दपार झाली.
  • देवेंद्र फडणवीस वगळता गेल्या अनेक वर्षांपासून जे-जे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला लाभले, त्यांच्यावर विरोधी पक्षनेते कमकुवतपणे भूमिका मांडण्याचा आरोप झाला. योगायोगानं महाराष्ट्रातले मागचे जवळपास 3 विरोधी पक्षनेते नंतरहून भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि यंदाच्या निवडणुकीत तर विरोधी पक्षनेता बनवण्या इतकेही आकडे विरोधकांना मिळाले नाहीत.
  • 2014 ला फडणवीस मुख्यमंत्री असताना काही काळ एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. कालांतरानं शिवसेना सत्तेत गेल्यानंतर शिंदेही सत्ताधारी बनले. शिंदेंच्या रिक्त जागेवर तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखेंना विरोधी पक्षनेता बनवलं गेलं. 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते असलेल्या विखेच भाजपमध्ये जावून मंत्री बनले. 2019 मध्ये मविआ काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून आले. नंतर शिंदेंच्या बंडामुळे युती सरकारमध्ये फडणवीस अर्थमंत्री झाले.
  • 2022 ला फडणवीसांच्या रिक्त जागेवर मविआतून अजित पवारांना विरोधी पक्षनेता केल गेलं. पण वर्षभरानं विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. अजितदादांच्या रिक्त पदावर काँग्रेसमधून वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मिळाली. ते पदावर कायम राहिले तरी अधून-मधून त्यांच्यावर मविआतूनच भाष्य होत राहिलं आणि या खेपेला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतकं सुद्धा संख्याबळ नाहीय. महाराष्ट्र स्थापनेच्या 1960 नंतरच्या राजकीय इतिहासात असं पहिल्यांदा घडलंय.
  • यावेळच्या विधानसभेचं चित्र सत्ताधारी बाकांवर 230 तर विरोधी बाकांवर 46 आमदार असं असणार आहे. 1990 म्हणजे जवळपास 3 दशकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवणारा भाजपहा पक्ष ठरलाय.. युती वा आघाडीत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर कुणाला न मिळालेला आकडा यंदा भाजप नेतृत्वात महायुतीला मिळाला. 2014 च्या ही मोदी लाटेत 122 जागा मिळवणाऱ्या भाजपनं त्या लाटेचाही रेकॉर्ड मोडत यंदा एकट्याच्या 132 जागा मिळवण्याचा रेकॉर्ड बनवलाय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article