Published on
:
25 Nov 2024, 5:16 pm
Updated on
:
25 Nov 2024, 5:16 pm
शिरूर : आष्टी -पाटोदा -शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा दणदणीत विजय झाला. विजयी सभेला संबोधित करताना सुरेश धस यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आ. पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे मुंडे समर्थकांना मोठे जिव्हारी लागले आहे. त्यामुळे मुंडे समर्थक मोठे आक्रमक झाले असून शिरूर कासार तालुक्यातील काही गावात या वक्तव्याचा निषेध आंदोलन केले आहेत. या आंदोलनात मुंडे समर्थकांकडून आ. सुरेश धस यांच्या विरोधात काही अक्षपार्य विधान करण्यात आल्याने हा वाद पुरताच विकोपाला गेला आहे. या वादामुळे आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
आष्टी -पाटोदा- शिरूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत झाली होती. ही निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीला मोठी रंगत चढली होती. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारासाठी आपल्या पक्षातील दिग्गज नेत्यांना प्रचार सभेचे निमंत्रण देऊन मतदारांना सभेच्या माध्यमातून भुरळ घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. यामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाटोदा येथे सभा घेतली. त्याचबरोबर भाजपच्या सरचिटणीस आ. पंकजा मुंडे यांची शिरूर आणि कडा येथे सभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट )चे उमेदवार मेहबूब शेख यांच्या वतीने शरद पवार यांची आष्टी येथे तर, खा.अमोल कोल्हे शिरूर मध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार )चे आ. बाळासाहेब आजबे यांची आष्टी येथे प्रचार सभा घेण्यात आली होती. या दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे आष्टी मतदार संघ पुरताच ढवळून निघाला होता.
चुरशीच्या लढतीमध्ये अखेर भाजपचे उमेदवार सुरेश धस हे 75 हजार अधिक मताधिक्याने विजयी झाले. विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर सुरेश धस यांच्यावतीने आष्टी येथे विजयी सभा घेण्यात आली. या विजयी सभेमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात काही खोचक विधान तर काही आरोप केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे आ.पंकजा मुंडे यांचे समर्थक पुरतेच दुखावले असून समर्थकातून सुरेश धस यांच्याविरोधात मोठा रोष व्यक्त केला जात आहे.
या रोषातून शिरूर कासार तालुक्यात काही गावांमध्ये आमदार सुरेश धस यांचे प्रतीकात्मक पुतळेही जाळण्यात आले आहेत. तर हे आंदोलन करताना काही मुंडे समर्थक कार्यकर्त्याकडून आ. सुरेश धस यांच्याविरुद्ध आक्षेपाहार्य विधान करण्यात आल्यामुळे आ.सुरेश धस गट ही आक्रमक होऊन त्या वाचाळ वीरांना 24 घंट्याच्या आत कारवाई करण्यात यावी व त्यांना अटक करण्यात यावी अशी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास आष्टी शहर बंद ठेवण्याचा पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील भाजप गोटामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
माजी आ. भीमराव धोंड्यांचाही हल्लाबोल
आष्टी - पाटोदा- शिरूर मतदार संघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे यांची ओळख होती. मात्र यावेळी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला तिकीट मिळत नाही म्हणून त्यांनी भाजपशी करून बंडखोरी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली आहे. सुरेश धस यांनी विजयी सभेमध्ये केलेले विधान हे त्यांना अशोभनीय आहे. सुरेशराव उपकाराची फेड अपकाराने करू नका असे म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केल्याने हा वाद अधिकच चिघळत चालला असल्याचे दिसत आहे.