Published on
:
25 Nov 2024, 5:42 pm
Updated on
:
25 Nov 2024, 5:42 pm
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविण्यासह व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक कामात गेल्या दोन महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग व्यस्त होता. त्यामुळे ही पाणी गळतीची कामे पाणी पुरवठा विभागाला तातडीने हाती घेणे शक्य होत नव्हते. आता निवडणुका संपल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ही दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील फ, ग आणि पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांवर गळती सुरू आहे. गळतीचे पाणी रस्त्यावरून वाहते असतेकाही ठिकाणी व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने त्या ठिकाणी पाण्याचे कारंजे सतत उडत असतात. यात शेकडो लीटर पाणी वाया जाते. रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे चालणे अवघड होऊन जाते. दुचाकी घासरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पाणी गळतीच्या तक्रारी वाढल्यामुळे केडीएमसीने निवडणुका संपताच दुरूस्त्यांची कामे तातडीने हाती घेतली आहेत.