Published on
:
25 Nov 2024, 4:16 pm
Updated on
:
25 Nov 2024, 4:16 pm
नागपूर : भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘घर घर संविधान’ कार्यक्रमाचा शुभारंभ संविधान दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याहस्ते होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, राष्ट्रीय एकात्मतेची भावन, उपेक्षित घटकातील समुदायांमध्ये त्यांच्या घटनात्मक अधिकारी व कर्तव्याबाबत साक्षरता आदीबाबत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान उपक्रम 26 नोव्हेंबर पासून पुढील प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येणार आहे.
नागपूर येथे हा शुभारंभ होत असून या समारंभाला समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उप संचालक विजय वाकुलकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखेडे, संशोधन अधिकारी आशा कवाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, नागपूर विभागातील विविध कार्यालयातील अधिकारी, सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळातील अधिकारी व कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, शासकीय वसतिगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, तृतीयपंथी आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.