हिंगोली (Hingoli territory minister) : जिल्ह्यातील तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षांचेच निवडूण आले असल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या मंत्री मंडळात जिल्ह्याचा पालकमंत्री मिळेल का, अशी प्रश्नसूचक उत्सुकता लागली आहे.
यापूर्वी एक वेळ जयप्रकाश दांडेगावकर व एक वेळ जयप्रकाश मुंदडा हे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. बर्याच काळापासून हिंगोलीशी किंबहुना मराठवाड्याशीही संबंध नसलेल्या नेत्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले गेले होते. यंदा तरी जिल्ह्याचा पालकमंत्री मिळेल का, अशी चर्चा होत आहे. तीन आमदारांपैकी आ.तान्हाजी मुटकुळे हे सलग तिसर्यांदा निवडून आले आहेत. तर आ.संतोष बांगर व आ.राजूभैय्या नवघरे हे दुसर्यांदा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे (Hingoli district) हिंगोली जिल्ह्याने महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते दिली आहेत. अशा परिस्थितीत या तिघांपैकी कोणाला तरी मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.