Published on
:
25 Nov 2024, 12:31 pm
Updated on
:
25 Nov 2024, 12:31 pm
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी अदानी समूहाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चेची मागणी केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ आणि जोरदार नारेबाजी केली. परिणामी दोन्ही सभागृहाचे कामकाज बुधवार, २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करावे लागले.
लोकसभेत सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या खासदारांनी अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये झालेल्या पोलिस गोळीबाराबाबत समाजवादी पक्षाने सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारी बारा वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. विरोधकांचा गदारोळ पाहून लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
राज्यसभेत, सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले की, त्यांना नियम २६७ अंतर्गत मुद्दे मांडण्यासाठी १३ नोटिसा मिळाल्या आहेत, ज्यात "अदानी समूहाच्या कथित भ्रष्टाचार, लाचखोरी आणि आर्थिक अनियमितता" वर चर्चा करण्यासाठी विरोधी खासदारांच्या नोटिसांचा समावेश आहे. खासदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार आणि भूस्खलनामुळे प्रभावित वायनाडमधील लोकांसाठी मदतीची आवश्यकता यावर चर्चा करण्यासाठी नोटीस देखील दिली होती. या सर्व नोटिसा फेटाळत सभापतींनी या संदर्भात दिलेल्या सूचनांनुसार या नोटिसा नाहीत, असे सांगितले. विरोधकांनी मागणी लावून धरल्याने धनखड यांनी प्रथम १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे प्रथम ११.४५ पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहात नांदेडचे माजी खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली
लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वसंतराव चव्हाण (महाराष्ट्र), हरिश्चंद्र देवराम चव्हाण (महाराष्ट्र), एसके नुरुल इस्लाम (पश्चिम बंगाल), एमएम लॉरेन्स (केरळ), एम पार्वती (आंध्र प्रदेश) यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश वाचून दाखवले. सभागृहाने एक मिनिट मौन पाळून या खासदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.