धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेल:आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घरा घरात झाला तर प्रत्येकाला शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हेच सूत्र समाजासाठी लागू झाल्याने विश्वशांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तसेच प्रत्येकाने चेहर्‍यावर हास्य ठेवणे या क्रांतिकारी प्रयोगामुळे ही जीवनात शांतीचा अनुभव येतो. प्रत्येकाने संकल्प करावा की घरामध्ये प्रवेश करतांना चेहर्‍यावर हास्य ठेवावे असे मत उज्जैन येथील आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत सात दिवसीय २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एमआयटी युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. तसेच एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. पंडित विजयशंकर मेहता म्हणाले, संतती, संपत्ती, संबंध आणि दुर्बल आरोग्य या चार मार्गाने जीवनात अशांती येते. अशा वेळेस शांतीसाठी जीवनाला चार टप्प्यांमध्ये विभाजीत करावे. व्यावसायिक जीवनात निष्काम राहणारे, सामाजिक जीवनात वचन बद्धतेचे पालन करणे, कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि स्वतःला शांत ठेवावे. यामुळे कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदेल. ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर म्हणाले,भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून जगाला वारकरी संप्रदायाने शांतीचा मार्ग दाखविला आहे. आजच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची वेगळी परिभाषा करणे योग्य नाही. आत्म स्वरूपाचा विचार करणे हे अध्यात्म असून ते सर्व धर्मात आहे. खर पाहता विश्वाला शांतीची गरज आहे आणि ती विज्ञानातून मिळेल. मनुष्याने ज्ञानाचा योग्य वापर केल्यास ते शक्य आहे. ज्ञान हे आंतरिक विचार करतो त्यासाठी रोज संतांचे वाङ्मय वाचावे. डॉ. विजय भटकर म्हणाले,वर्तमान काळात मानवाने विज्ञानाच्या आधारे सर्व गोष्टी साध्य केल्यात परंतू जीवनात सुख आणि शांती नाही. यासाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान आवश्यक आहे. सत्याची परिभाषा ओळखणे गरजेचे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article