हिंगोली (MLA Santosh Bangar) : कळमनुरी विधानसभा मतदार संघातून आ. संतोष बांगर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. एकीकडे मंत्री मंडळाची लगबग सुरू झाली असताना २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना तात्काळ विमान पाठविल्याने ते मुंबईत दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे अत्यंत जवळचे व विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या मतदार संघात कोणत्याही नेत्यांच्या सभाविना एकहाती व कार्यकर्त्यांच्या बळावरच मोठा विजय मिळविला आहे. मतमोजणीच्या दिवशी झालेल्या मारहाणीच्या घटनेत त्यांचा पुतण्या गौरव बांगर याला पोटामध्ये गोळी लागल्याने त्याच्यावर हैदराबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे.
त्यासाठी आमदार संतोष बांगर यांच्यासह कुटुंबिय हैदराबाद येथेच होते. मंत्री मंडळाची लगबग वरिष्ठ स्तरावर सुरू झाल्याने शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपस्थित राहण्याचे संदेश दिले. आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे हैदराबाद येथे रूग्णालयात असल्याने त्यांना मुंबईला आणण्याकरीता खास विमान २४ नोव्हेंबर रोजी पाठविले होते. आ.संतोष बांगर हे नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह मुंबईत दाखल झाले. लवकरच मंत्रीमंडळ गठीत होणार आहे. त्यामुळे आ.संतोष बांगर यांचा मंत्री मंडळात समावेश होण्याची दाट शक्यता बळावली आहे.