उद्या महायुती सरकारचा शपथविधी?:भाजपचे 10, शिवसेना - NCP चे प्रत्येकी 5 आमदार शपथ घेण्याची शक्यता, संभाव्य मंत्र्यांची नावे समोर

2 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान यश मिळाल्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीची राजभवनात लगबग सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होईल. त्यात भाजपच्या 10, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 5 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. तूर्त नव्या सरकारचे नेतृत्व कुणाकडे राहणार? हे आज रात्री उशिरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात भाजपच्या पारड्यात सर्वाधिक 132 जागा गेल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41जागा मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची या निवडणुकीत प्रचंड हाराकिरी झाली. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. सपच्या खिशात 2, तर इतर पक्ष व अपक्षांच्या 10 जागा निवडून आल्या. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झोाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यात पहिल्या टप्प्यात महायुतीचे 20 आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील. यात भाजपच्या 10, तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 5 मंत्र्यांचा समावेश असेल. तिन्ही पक्षांनी आपापल्या संभाव्य मंत्र्यांची नावे दिल्लीला पाठवली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादीकडून कोण होणार मंत्री? सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे बडे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे व अनिल पाटील हे मंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अद्याप समोर आली नाही. तसेच हे सरकार कुणाच्या नेतृत्वात काम करणार? म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार? हे ही अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित आहे. फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार विश्लेषकांच्या मते, महायुतीच्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सर्व सूत्रे होती. त्यांनी आपल्या कुशल रणनीतीने भाजप व महायुतीचे विक्रमी उमेदवार निवडून आणले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर रहावे लागले होते. त्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेतील बंडाळीनंतर हे पद एकनाथ शिंदे यांच्याकडे चालून गेले होते. त्यामुळे आता भाजप नेतृत्वाने हे पद देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article