Published on
:
25 Nov 2024, 1:56 pm
Updated on
:
25 Nov 2024, 1:56 pm
वडीगोद्री : मुख्यमंत्री कोणीही झाले तरी आमच्यासाठी कोणीच समाधानकारक नाही. आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. ७०-७५ वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे, काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नसल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पञकारांशी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले की,आमची जात आणि आमचे लेकरं बाळं मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असे आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार असुन निवडणूक एकाच जातीवर निवडून येणे शक्य नव्हते म्हणून आम्ही मैदानात उतरलो नाहीत. परंतु माझ्या मराठ्याशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. मराठे गप्प आहेत. शांत आणि संयमी आहे. परंतु त्यांच्या भयंकर आग आहे. ताकत सुद्धा आहे. मराठ्यांना खेटण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पहिल्यांदा तेच सत्तेत होते आणि आताही तेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावं लागलं असतं हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठ्यांनी या नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते,यामुळे आम्हाला त्यांचे काही सोयर सुतक नाही. आता देशात झाले नाही आता मराठ्यांचा नाद करायचा नाही. मराठ्यांचे मनगटात बळ आहे. त्यांच्यातही रग आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल. तुम्ही आहेतच किती? तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही,असेही जरांगें पाटील म्हणाले.
मराठ्यांनी सरकारला पाच वर्षे हाताळला आहे. त्यामुळे त्यांना हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय? नाही झाले काय? त्याचे आम्हाला कुठलेही सोयरं सुतक नाही. आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले आहे. आता मोठा लढा उभा करायचा असल्याचे मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.