Published on
:
25 Nov 2024, 1:48 pm
Updated on
:
25 Nov 2024, 1:48 pm
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच लोकसभा आणखी जास्त डिजीटल झाल्याचे चित्र दिसले. खासदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक टॅब आणि डिजिटल पेनच्या मदतीने त्यांची हजेरी नोंदवली. यात काही खासदारांना काही अडचणी आल्या. त्यांना मदत करण्यासाठी मदत करणारे कर्मचारी तिथे उपस्थित होते. या टॅबद्वारे हजेरी नोंदवण्याच्या पद्धतीला खासदारांनी पसंती दर्शवलेली दिसत आहे.
लोकसभा सचिवालयाने सांगितले की, संसद पेपरलेस करण्याच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून लोकसभेध्ये चार काउंटरवर इलेक्ट्रॉनिक टॅब ठेवण्यात आले आहेत. तसेच सध्या या काउंटरवर प्रत्यक्ष हजेरी नोंदवही ठेवली जाईल. सदस्यांना टॅबचा प्राधान्याने वापर करावा आणि संसद पेपरलेस करण्यास मदत करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
खासदारांना प्रथम टॅबवरील ड्रॉप-डाउन मेनूमधून त्यांचे नाव निवडावे लागेल, डिजिटल पेनच्या मदतीने त्यांची स्वाक्षरी करावी लागेल आणि त्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी 'सबमिट' बटण दाबावे लागेल. तांत्रिक सहाय्यासाठी प्रत्येक काउंटरवर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातील अभियंत्यांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान दैनंदिन भत्ता मिळविण्यासाठी सदस्यांना त्यांची उपस्थिती रजिस्टरमध्ये नोंदवावी लागते. याआधी लोकसभा सदस्य मोबाईल ॲप्स वापरून हजेरी लावत असत.