Published on
:
25 Nov 2024, 10:28 am
Updated on
:
25 Nov 2024, 10:28 am
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. या कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात कर भरणा करण्यासाठी आलेल्या एका 67 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीकांत पुरूषोत्तम शेठ (67) असे मृत वृद्धाचे नाव असून ते पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या अयोध्या नगरीतील राम सोसायटीत राहत होते.
डोंबिवलीकरांच्या सोयीसाठी केडीएमसीचे डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात सद्या नागरी सुविधा केंद्रासह जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, अशी नागरिकांशी संबंधित फक्त दोनच कार्यालये कार्यरत आहेत. येथील नागरी सुविधा केंद्रात मालमत्ता (सदनिका/दुकानी गाळे), पाणी, आदी कर भरणा केला जातो. शिवाय जन्म-मृत्यू नोंदणीसाठी लागणारे शुल्क, नोंदणी प्रमाणपत्र, आदी कामांसाठी शासकीय सुट्ट्या वगळता डोंबिवलीकर मोठ्या संख्येने येत असतात.
नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांमध्ये केडीएमसीची यंत्रणा व्यस्त असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. सोमवार उजाडताच रखडलेली कामे करण्याकरिता नागरिकांनी केडीएमसीच्या नागरी सुविधा केंद्रांकडे धाव घेतली होती. त्यामुळे डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयात देखिल गर्दी वाढली होती.
अयोध्या नगरीतील राम को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे श्रीकांत शेठ हे देखील सोसायटीच्यावतीने पाण्याच्या दोन बिलांचा भरणा करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे पाण्याची 2 बिले आणि तसे 2 धनादेश होते. केंद्रातील एका खिडकीसमोर रांगेत उभे असताना श्रीकांत शेठ यांना अचानक चक्कर आल्याने ते स्वतःहून तेथील बाकड्यावर बसले. मात्र काही क्षणांत ते बेशुद्धावस्थत गेले. एकीकडे सुरक्षा रक्षकांनी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडून अँब्युलन्स मागवली. तोपर्यंत अर्धा तास निघून गेला. तरी दुसरीकडे जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील डॉ. दीपा बगरे यांनी तात्काळ केंद्रात धाव घेऊन तपासले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बेशुद्धावस्थेतील राम शेठ यांना अँब्युलन्समधून शास्त्रीनगर हॉस्पिटलला हलविले. तेथील डॉ. संगम सावकारे यांनी इसीजीद्वारे तपासून मृत घोषीत केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाला असल्याचे डॉ. सावकारे यांनी सांगितले. मधुमेहग्रस्त असलेल्या श्रीकांत यांना चार-पाच महिन्यांपूर्वी निमोनिया आजार झाला होता. या आजारातून ते मुक्त झाले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना कवटाळले. त्यांच्या मृत्यूची खबर कळतच नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. या घटनेची नोंद घेतल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वृद्धांना गर्दी-रांगेत उभे करणे धोक्याचे
वयोवृद्ध नागरिकांना गर्दी किंवा लांबलचक रांगेत उभे करणे धोक्याची असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. हा वृद्ध रांगेत उभा होता. इतक्यात त्याला भोवळ आली. पाठीमागे असलेल्या बाकड्यावर स्वतःहून बसल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत गेला. सुरक्षा रक्षकांनी धावपळ करून डॉक्टर, अँब्युलन्स मागवली. तथापी तोपर्यंत उशीर झाला होता. घरच्यांनी वा सोसायटीने अशा वृद्धांना शासकीय/निमशासकी कार्यालयांत लागलेल्या लांबलचक रांगांसह गर्दीच्या ठिकाणी पाठविणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. याचा प्रत्यय केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेतून आला आहे. गर्दी वाढल्यानंतर घुसमट होते. श्वास कोंडला जातो. याचा सर्वाधिक त्रास बालकांसह वृद्धांना होतो. अनेक दाम्पत्य जन्माची नोंद करण्यासाठी आपल्या बाळांना घेऊन येत असतात.