विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात झालेली अटीतटीची लढत व वादविवादामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिवसापासूनच आमदार कांदे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. अखेर निकालात विद्यमान आमदार कांदे यांनी बाजी मारल्यामुळे नांदगावमध्ये कांदे यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
आमदार कांदेंच्या विजयाची कारणे
- मनमाडकरांचा अनेक वर्षांचा पाण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
- कोणतीही व्यक्ती आ. कांदे यांना भेटू शकते किंवा फोन करू शकते.
- नागरिकांसाठी सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम तसेच आरोग्यसेवा बळकटीकरण.
- नागरिकांना शासकीय कामासाठी सातत्याने मदत.
- लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वतःहून भरून घेतले.
- धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेणे तसेच कार्यक्रमांचे आयोजन.
- जळीतग्रस्त कुटुंबास शासनाची वाट न बघता मदत.
- आणीबाणी काळात मतदारसंघातील कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे.
- शिवसृष्टी उभारण्यात आली असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.
निकालात ऐनवेळी एन्ट्री घेतलेल्या भुजबळांना नांदगावकरांनी नाकारले, तर आ. कांदे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकत त्यांच्या बाजूने कौल दिला. 2019 मध्ये आ. कांदे या मतदारसंघात निवडून आले, तेव्हापासून मतदारसंघात त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. यामध्ये मुख्यत: मनमाडकरांच्या पाणीप्रश्नाला हात घालत करंजवण पाणी योजनेच्या माध्यमातून त्यांनी पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावला आहे. हे करत असताना आ. कांदे यांनी मतदारसंघातील मतदारांशी आपला जनसंपर्क कायम जपून ठेवला आहे. मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा शासकीय छोटी-मोठी कामे असतील, कांदे यांनी ती सातत्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून सुहास कांदे यांना पुन्हा एकदा मताधिक्याने नांदगावकरांनी निवडून दिले. आ. कांदे यांना माजी आ. संजय पवार, राजाभाऊ देशमुख यांनी खंबीर साथ दिली, तर माजी आ. अनिल आहेर यांनी पाठिंबा दिला. दुसरीकडे अपक्ष म्हणून लढलेले समीर भुजबळ मात्र एकाकी पडल्याचे दिसून आले. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे पुत्र गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली होती. (उबाठा) शिवसेनेसारख्या पक्षाचे उमेदवार असूनदेखील गणेश धात्रक यांना या निवडणुकीमध्ये प्रभाव पाडता आला नाही. अपक्ष म्हणून मराठा उमेदवार असलेले डॉ. रोहन बोरसे हेदेखील करिष्मा दाखवू शकले नाहीत. डॉ. बोरसे यांचे नांदगावकरांसमवेत वैयक्तिक असलेले संबंध यामुळे डॉ. बोरसे यांची पारडेदेखील जड वाटत होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. निवडणुकीच्या पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत सुहास कांदे यांनी आघाडी कायम राखली. एकंदरच विकासकामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या बळावर कांदे यांनी आपला गड पुन्हा राखला.