संभाजीनगरमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपद?:अतुल सावे, अब्दुल सत्तारांसह संजय शिरसाटही शर्यतीत; जिल्ह्यात महायुतीचे 9 आमदार

1 hour ago 1
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळाले. जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. पण त्यापैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीला यश मिळाले नाही. त्यामुळे आता येथील कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल सावे हे औरंगाबाद पूर्व, प्रदीप जैस्वाल हे औरंगाबाद मध्य, संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम, अब्दुल सत्तार हे सिल्लोड, प्रशांत बंब हे गंगापूर, रमेश बोरनारे हे वैजापूर, विलास भुमरे हे पैठण, अनुराधा चव्हाण या फुलंब्री व संजना जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. यापैकी सावे व सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यामुळे आता त्यांना पुन्हा नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार का? विशेषतः आमदार संजय शिरसाट यांचीही मंत्रीपदाची इच्छा पूर्ण होणार का? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अतुल सावेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अतुल सावे यांनी या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यांनी यंदा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना अस्मान दाखवून औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचा आपला गड राखला. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून उद्योग व खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास वक्फ विभागाचे काम पाहिले आहे. ते गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रीही होते. जातीय समीकरणात ते सर्वात पुढे आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अब्दुल सत्तार प्रबळ दावेदार आमदार अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. सध्या त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आहे. मागील 40 वर्षांपासून ते राजकारणातील आपले अस्तित्व टिकवून आहेत. 1984 मध्ये त्यांनी गामपंचायत निवडणुकीपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 1994-95 मध्ये त्यांनी तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. ते सिल्लोडचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 1999 साली त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेत जाण्याचा अपयशी प्रयत्न केला. पण त्यानंतर 2001 मध्ये विधानसभेवर जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर 2009, 2014 व 2019 मध्ये ते विधानसभेवर पोहोचले. 2014 मध्ये त्यांना पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धविकास खात्याचे मंत्रीपद मिळाले. 2019 मध्ये त्यांना महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खार जमीन विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्रीपद मिळाले. त्यांनी धुळे, हिंगोलीचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे. सध्या ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. संजय शिरसाट मंत्रीपदासाठी उत्सुक शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. पण तसे घडले नाही. आता महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळाले होते. प्रदीप जैस्वाल एक अनुभवी नेते प्रदीप जैस्वालहे 1996 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते 2009, 2019 मध्ये विधानसभेवर पोहोचले. यंदा पुन्हा ते विधिमंडळात दिसतील. त्यांचा लोकसभा व विधानसभेतील अनुभव पाहता त्यांच्या नावाचाही मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. प्रशांत बंबही उत्सुक प्रशांत बंब हे 2009 मध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर झालेल्या 2014, 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ते विधानसभेवर पोहोचले. एकूण 4 वेळेस निवडून आलेले प्रशांत बंब यांना यावेळी मंत्रीपद मिळते का? हा प्रश्नही जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. जिल्ह्यातून 2 महिला नेत्या विधानसभेवर विशेष म्हणजे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनुराधा चव्हाण (फुलंब्री) व संजना जाधव (कन्नड) या दोन महिला आमदार विधानसभेवर पोहोचल्या आहेत. संजना जाधव यांच्यामागे त्यांचे वडील रावसाहेब दानवे यांचे तगडे पाठबळ आहे. दरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे हे सुद्धा पैठण मतदारसंघातून विधानसभेवर पोहोचलेत. त्यामुळे भुमरेही आपल्या मुलामागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article