Published on
:
25 Nov 2024, 8:12 am
Updated on
:
25 Nov 2024, 8:12 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज (दि.२५) मोठा दणका बसला आहे. बेकायदेशीर अटकेचा दावा फेटाळत न्यायालयाने शहा यांची सुटका करण्यास नकार दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि.२५) BMW हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहच्या जामीन याचिकेवर सुनावणी घेतली. न्यायालयाने शिवसेनेचे माजी नेते राजेश शाह यांचा २४ वर्षीय मुलगा मिहिर यांच्यावरील बेकायदेशीर अटकेचा दावा फेटाळला. तसेच त्याला जामीन देखील नाकारला आहे.
शिवसेनेच्या माजी नेत्याचा २४ वर्षीय मुलगा शाह आणि त्यांचा कार चालक राजर्षी बिदावत यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. याचिकेत दोन्ही आरोपींनी त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांची तात्काळ सुटका करण्याची विनंती देखील केली होती.
मुंबईतील वरळी परिसरात ९ जुलै रोजी भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा नावाच्या महिलेला चिरडले. कारने महिलेला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ओढले. या अपघातात त्यांचे पती प्रदीप नाखवा हे देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर मिहीर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ बेपत्ता होता. त्याच बीएमडब्ल्यू कारमधून ते वांद्रे येथील कला नगर भागात गेले होते. अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेला शाह यांचा चालक बिदावत याला घटनेच्या दिवशी अटक करण्यात आली होती. घटनेनंतर मिहीरने वडील राजेश शहा यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता, असे या प्रकरणात उघड झाले आहे. त्यानंतर राजेशने आपल्या मुलाला शहर सोडण्याचा सल्ला दिला होता आणि अपघाताची जबाबदारी राजऋषी घेणार असल्याचे सांगितले होते. वडिलांशी बोलल्यानंतर मिहीर इकडे तिकडे लपून बसू लागला. मात्र, घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.