महाराष्ट्रासाठी प्रत्येक मराठी माणसाने एकत्र यावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहेच. तसेच राज्यात ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी मोदी शहांचे कारस्थान असेही संजय राऊत म्हणले.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एक है तो सेफ है असं ते म्हणतात. पण एक असेल त्यात दुफळी निर्माण करायची, मतं विभागणी करायची, त्यासाठी पैसा वापरायचा, दबाव टाकायचा आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदींचं यश आहे. मोदी हे देशाचे नेते आहेत हे मी मानायला तयार नाही अजून. देशाच नेते पंडित नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह होते. सिंह यांनी देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि अशा प्रकारची कृत्य केली नाहीत असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही. ज्यांना ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकाने एक व्हावं. ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी मोदी शहांचे कारस्थान सुरू आहे. या महाराष्ट्रात ठाकरे, पवार यांचे नाव राहू नये हे मोदी आणि शहा यांचे दुःस्वप्न आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतून ठरणार, मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील. जो गुजरातचा जास्त फायदा करेल असा ते मुख्यमंत्री निवडतील. राज्यात मतांचे ध्रुवीकरण झाले आहे, ही त्यांची मोठी ताकद आहे. जाती, धर्मात आणि पक्षात फुट पाडून ध्रुवीकरण करणे हे मोदीजींची ताकद आहे. मोदी आणि शहा हे जर देशाचे नेते असते त्यांना अशा गोष्टी कराव्या लागल्या नसत्या असेही संजय राऊत म्हणाले.