Published on
:
21 Nov 2024, 11:52 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:52 pm
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन, सोहळ्यापूर्वी चित्रपटानेच सुरू करायचे, ही एक उत्तम कल्पना इफ्फीमध्ये गतवर्षापासून लागू करण्यात आलेली आहे, त्याचे स्वागत केलेच पाहिजे. गेली 2/3 वर्षे उद्घाटनीय आणि समारोपीय सिनेमांनी जरा त्या स्लॉटला असणारे महत्त्व लक्षात घेता त्या अपेक्षेने जरा निराशाच केली होती. यंदा मात्र उद्घाटनीय म्हणून ‘बेटर मॅन’ सारखा विलक्षण वेधक चरित्रपट पाहायला मिळाला. त्यानिमित्ताने...
‘द ग्रेटेस्ट शोमन’ सारख्या कलाकृतीसाठी सुप्रसिद्ध असणारा मायकेल ग्रेसी या ऑस्ट्रेलियाच्या दिग्दर्शकाची ‘बेटर मॅन’ (ऑस्ट्रेलिया, यूएसए) ही कलाकृती उद्घाटनीय असणे, हे यंदा कंट्री फोकस ऑस्ट्रेलिया असणे, यासही साजेसेच. गेल्या वर्षी कंट्री फोकस हा विभागच इफ्फीमध्ये नव्हता, ते पुन्हा संलग्न करण्यात आले, हे ही महत्त्वाचे.
रॉबी विल्यम्स या ब्रिटिश पॉप कलाकाराचे काहीकाळ एखाद्या उल्केसारखे प्रभावित करणारे दर्शन घडून नंतर तो लुप्त होणे आणि पुन्हा त्याचे चमकदार पुनरागमन होते. असा या चरित्रनायकाचा आणि कथानकाचाही प्रवास आहे. पॉप संगीत विद्येची तरुणाईची ऊर्जा या सिनेमाच्या केवळ संगीतात किंवा नृत्याच्या चित्रीकरणातच नव्हे तर दृश्य रचनेत आणि संकलनातूनही उधाणली आहे. सिनेमाच्या भाषेतूनही ही पॉपची झिंग प्रतीत होते. अतिशय उत्फुल्ल असा हा सिनेमा आहे. केवळ विषय म्हणून नव्हे पण हाताळणीची विधाही सांगीतिक (म्युझिकल) आहे.
मायकेल ग्रेसी हा दिग्दर्शक मुळात दृकचमत्कृती कलाकार आहे, त्याचा परिणाम संपूर्ण चित्रपटाच्या हाताळणीवर अगदी ठळकपणे दिसून येतो. ‘बेटर मॅन’मधील चरित्रनायक रॉबी विल्यम्स नावाचा प्रसिद्ध ब्रिटिश पॉप संगीतकार आहे. पण इतर सर्व व्यक्तिरेखा माणसांसारखी माणसे दाखवत असताना रॉबी विल्यम्सची मध्यवर्ती व्यक्तिरेखा मात्र संपूर्ण चित्रपटभर चिंपाझी माकडसदृश्य दाखवली आहे. यासाठी ‘मोशन कॅप्च्युअर’ हे तंत्रज्ञान प्रयुक्त केले आहे. ‘मोशन कॅप्च्युअर’ यात अभिनेत्यांना घेऊन त्यांच्याकडून अपेक्षित ऍक्शन्स रेकॉर्ड केल्या जातात. या रेकॉर्डेड माहितीचा वापर करून अपेक्षित असणारी डिजिटल व्यक्तिरेखा निर्माण केली जाते. तशी येथे जोन्नो डेव्हीएस या ब्रिटिश अभिनेत्यास घेऊन मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रौढ वयातील आवाज मात्र दस्तुरखुद्द रॉबी विल्यम्सचाच वापरण्यात आला आहे. अर्थात येथे तंत्रज्ञानाचा वापर असला तरी तो निव्वळ उपलब्ध आहे. म्हणून वापर आहे, असे नव्हे! तर रॉबी विल्यम्स एका मुलाखतीत म्हणाला होता की तो परफॉर्म करत असताना माकडच परफॉर्म केल्यासारखे त्यास जाणवायचे. पण केवळ या मुलखातील संदर्भ म्हणून नव्हे तर सिनेमाच्या आशयविधानाशीही ही क्लुप्ती तादात्म्य पावलेली आहे. रॉबी विल्यम्सकडे त्याचे चाहते किंवा जग कसे पाहते, हे या कलाकृतीचे आशयसूत्र नसून रॉबी विल्यम्स स्वतःकडे कसा पाहतो, याचा प्रत्यय येथे दिग्दर्शकास रसिक प्रेक्षकांना द्यायचा आहे. तपशिलापेक्षाही व्यक्तिरेखेचे सारतत्व आणि त्याचे प्रत्ययकारी दर्शन घडवणे येथे दिग्दर्शकास महत्वाचे वाटते. त्यामुळेच नेहमीच्या चरित्रपटांपेक्षा हा विलक्षण ठरतो.