विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावले. एक्झिट पोल म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गट यांचे फार मोठे षड्यंत्र आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. 160 ते 165 जिंकून महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांनी एक्झिट पोलबाबत त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, मतदान गुप्त असते हे सर्वांना माहीत असूनही काही लोक हे उपद्व्याप करून गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा संशोधनाचा विषय आहे. पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पार दाखवले जात होते. हरयाणातील परिस्थिती वेगळी दिसत होती, पण तिथे काय झाले? याचा दाखलाही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
सत्तास्थापनेइतके बहुमत मिळेल
महायुतीच्या लोकांनी निवडणुकीत यंत्रणांचा गैरफायदा घेत पैशाचा पाऊस पाडला. पण ही निवडणूक पैशापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान अभिमान या विषयावर लढली गेली आहे. आम्हाला खात्री आहे की, जनतेने पैशाच्या प्रवाहात न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केले आहे, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून सत्तास्थापनेइतके बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कोण… 23 तारखेला सांगेन
काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे अशा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर खासदार राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर निर्णय होईल. काँग्रेस नेतृत्वात सरकार स्थापन होईल असे मी मानत नाही. नाना पटोले यांनी तसे म्हटले असेल किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनी आपला मुख्यमंत्री होणार असे सांगितले असेल तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, खरगे यांनी तसे जाहीर करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी 23 नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी सरकार स्थापन करण्याचा दावा करेल आणि त्यानंतर 26 नोव्हेंबरला प्रत्यक्ष सरकार स्थापन करेल, असे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे 23 तारखेला साडेदहा-अकरा वाजता सांगेन, असेही संजय राऊत म्हणाले.