Published on
:
21 Nov 2024, 2:08 pm
Updated on
:
21 Nov 2024, 2:08 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. कथित यूएस लाचखोरीच्या आरोपानंतर केनियाने अदानी समूहासोबतचा प्रस्तावित पॉवर ट्रान्समिशन करार रद्द केला आहे. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली.
रुटो म्हणाले की, ‘देशातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना रद्द केली आहे. याबाबत आदेश दिले आहेत. भारतातील अदानी समूहाने या प्रकल्पासाठी बोली लावली होती. तसेच ऊर्जा मंत्रालयाने अदानी समूहाच्या एका युनिटसोबत पॉवर ट्रान्समिशन लाइन्स उभारणीसाठी 700 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीचा करार केला होता. पण या प्रस्तावावरही पुनर्विचार करणार आहे.’
अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर सिक्युरिटीज फसवणूक, वायर फ्रॉड आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि हे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, या वृत्तानंतर आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani Group shares) २० टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्स शेअर्सला सर्वाधिक फटका बसला. हा शेअर्स २० टक्के घसरला. अदानी ग्रीन शेअर्स सुमारे १८ टक्के घसरला. अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर १३ ते १४ टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायजेस, अंबुजा सिमेंट्स, एसीसी, अदावी पोर्ट्स या शेअर्सना १० टक्क्यांचे लोअर सर्किट लागले.
न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले. सौरऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी लाच देणे आणि सुमारे ३ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे.