निधीची टंचाई:मनरेगा मजुरांची तीन महिन्यांची मजुरी थकली, जिल्ह्यात 48 हजार 925 मजुरांतून नाराजीचा सूर

6 days ago 3
दसरा सण एका दिवसावर येऊन ठेपला असताना मनरेगावर काम करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील ४८ हजार ९२५ मजुरांची जुलै, ऑगस्ट व सप्टेंवर या तीन महिन्यांची मजुरी थकली आहे. त्यामुळे त्यांचा दसरा सण आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीचा सण अंधारात जावू नये, यासाठी शासनाने तातडीने नियोजन करून मजुरांची थकलेली रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी मजूर वर्ग करत आहेत. मजुरांची थकलेली रक्कम ही जवळपास ८ कोटी ८० लाख रुपये असल्याची माहिती आहे. शासनाकडे फंड नसल्यामुळे ही रक्कम थकल्याचे कळते. मनरेगा योजनेवर काम करणाऱ्या मजुरास पंधरा दिवसांच्या आत मजुरी देण्याचा शासनाचा नियम आहे. परंतु, हा नियम बुलडाणा जिल्ह्यातील मजुरांसाठी अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. कारण, मजुरांना तीन महिन्यांपासून काम करून देखील मजुरीचे पैसे मिळालेले नाहीत. मजुरीचे पैसे पंधरा दिवसात मजुरांना प्राप्त न झाल्यास हजेरी पत्रक सादर केल्याच्या सोळा दिवसानंतर विलंब झाल्यास प्रतिदिन वेतनाच्या ०.०५ टक्के दराने विलंब मिळण्याचा अधिकार मजुरास आहे. परंतु, बहुतांश मजुरांना या नियमाची माहिती नाही. ज्या मजुरांना नियम माहित आहेत, ते मजूर ठेकेदार व अधिकारी यांच्याशी वाईटपणा नको म्हणून विलंब आकाराची मदत मागत नाहीत. या योजनेवर काम करणाऱ्या मजुराला प्रतीदिन २९७ रुपये मजुरी देण्यात येते. ग्रामीण कुटूंबाजवळ जॉबकार्ड उपलब्ध आहे. त्यांना आर्थिक वर्षात शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी असलेली ही योजना आहे. जॉब कार्ड असलेल्या मजुराने संबंधित ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी केल्यास त्याला पंधरा दिवसाच्या आत काम उपलब्ध करून द्यावे लागते. काम न दिल्यास त्या मुजुरास रोहयोच्या नियमानुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा अधिकार आहे. परंतु, याची माहिती बहुतांश मजुरांना नसल्याने व मागणी करूनही काम न मिळालेले मजूर या भत्त्यापासून वंचित राहत असल्याचे वास्तव असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशी आहेत मनरेगाची कामे मनरेगात २६२ कामांचा समावेश आहे.त्यामध्ये घरकुल, सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, शोष खड्डे, केळी लागवड, फळबाग, वृक्ष लागवड, बांबू लागवड यासह इतर कामांचा समावेश आहे. मजुरीच्या पैशासाठी चकरा मारुन थकलो ^वर्णा शिवारात सुरू असलेल्या फळबाग लागवडीवर जुलै, ऑगस्ट व सप्टेबर असे तीन महिने काम केले. परंतु, आजपर्यंत मला मजुरीची रक्कम मिळाली नाही. पैसे नसल्यामुळे दसरा सण साजरा करता येत नाही. मजुरीच्या पैशासाठी खामगाव पंचायत समितीत चकरा मारुन थकलो. भाड्यात पैसे गेले. शिवाय मजुरी सुध्दा बुडाली आहे. - संतोष इंगळे, मजुर वर्णा. दोन तालुक्यांतून अधिक जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत खामगावातील ६, ७२९ मजुरांची १ कोटी २४ लाख ६४ हजार ४९६ रुपये, तर देऊळगावराजातील ४, ७८० मजुरांचे ८५ लाख ६८ हजार ७४७ रुपये देणे बाकी आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article