Published on
:
16 Nov 2024, 5:19 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:19 am
वाडा : वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीतून वाहत असलेल्या पिंजाळ नदीवर मलवाडा गावाजवळ पाटबंधारे विभागाने बंधारा उभारला आहे. नदीचे पात्र लवकर खालावत नसल्याने पीक व मलवाडा गावातील लोकांसाठी या बंधाऱ्यामुळे मोठा दिलासा मिळतो. पावसाळा संपून अनेक दिवस उलटूनही या बंधाऱ्याचे गेट मात्र बंद करण्यात आले नसून वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
वाडा तालुक्यातून पिंजाळ, वैतरणा, तानसा व देहर्जे या बारमाही पाणी असलेल्या नद्या वाहत असूनही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने जनतेला उन्हाळयात टंचाईचा सामना करावा लागतो. पिंजाळ ही तालुक्यातील महत्त्वाची जलवाहिनी असुन तिच्या किनाऱ्यावर वसलेले कित्येक गावे बारमाही पाण्यामुळे सुजलाम सुफलाम झाले आहेत. मलवाडा गावाजवळ दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला असून ८० मीटर लांब, ४ फूट रुंद तर सुमारे अडीच ते तीन मीटर उंच हा बंधारा आहे.
बंधाऱ्याचे गेट गेले चोरीला
२० लाख रुपये खर्चुन उभारलेला हा बंधारा आता गेट लावून बंद करणे गरजेचे आहे. याचं बंधाऱ्यामुळे जवळपास ५ किलोमिटर पर्यंत लाखों लिटर पाणी साठणार आहे. बंधाऱ्याचे गेट अज्ञात चोरट्यानी चोरल्याचे कारण देऊन मागील पूर्ण वर्षे पाटबंधारे विभागाने हा बंधारा बंद केला नाही. यावर्षीही हीच परिस्थिति असून गेट उपलब्ध करायला तरतूद नसेल तर बंधारे बांधता कशाला असा सवाल लोकांनी विचारला आहे.
गेट खरेदी करण्याचा प्रस्ताव
नदीचे पाणी दिवसेंदिवस कमी झाले असतांना लघु पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्याचे गेट बंद करावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबत उप अभियंता अजित जाधव यांना विचारणा केली असता चोरीस गेलेल्या गेट ऐवजी नवीन गेट खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, ज्याची माहिती घेऊन कार्यवाही करतो असे त्यांनी सांगितले.