पुण्यात सिंचन भवन कार्यालयावर कुकडीच्या पाणीप्रश्नासाठी एल्गार:श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा, अधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन आंदोलन मागे

2 hours ago 1
डिंभे ते माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने मार्गी लावावे, साकळाई योजनेच्या कामाला मंजुरी मिळावी, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात, आदी मागण्यांसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे सिंचन भवन कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. वळसे पाटील यांनी आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागातील कुकडी, घोड, मीना नदीवरील ६५ बंधाऱ्यांचा समावेश कुकडी प्रकल्पात करावा व त्या भागातल्या चार उपसा सिंचन योजनेला परवानगी देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या मागण्या रद्द कराव्यात, कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेवर पाणी देण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही, शासनाकडून या बोगद्याला मंजुरी दिली होती, परंतु अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. नगर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावे, यासाठी साकळाई योजनेला तत्वत: मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली, परंतु ही योजनादेखील प्रलंबित आहे. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. राजेंद्र म्हस्के म्हणाले की, दिवसेंदिवस कुकडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कुकडी प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आहे. वळसे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यास कुकडी कालव्याचा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होईल. ते त्यांच्या भागातल्या लोकांसाठी इमानदारीने वागत आहेत, परंतु श्रीगोंदे तालुक्यातील नेते बेईमान आहेत. सर्व जण भावी आमदार म्हणून मिरवत आहेत. या सर्व भावी आमदारांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आशीर्वाद विसरू नयेत, अशी टीका त्यांनी केली. प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सांगळे यांनी आंदोलकांना सांगितले, की आम्ही आपल्या मागण्यांचा स्वीकार करतो. आपल्या भावना रास्त असून, त्या वरिष्ठ पातळीवर पोहोचवून लवकरच मार्ग काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संतोष लगड, माऊली मोटे, भूषण बडवे, भाऊसाहेब मांडे, रघुनाथ सूर्यवंशी यांची भाषणे झाली. आरपारची लढाई लढणार डिंभे ते माणिकडोह बोगद्यासाठी, साकळाई प्रश्नासाठी, दिलीप वळसे पाटील यांच्या मागण्या रद्द करण्यासाठी पुढचे आंदोलन मंत्रालयात करणार असून, ही लढाई आरपार लढणार असल्याचे शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article