ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, त्यांची नात व खा. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. खासदार सुनेत्रा पवार या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत. यासंबंधी खा. सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून व्हीडिअो प्रसिद्धीला देण्यात आला. त्यानुसार प्रतिभा पवार व रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्कच्या प्रवेशद्वारावर तब्बल अर्धा तास थांबवून ठेवण्यात आले. अर्ध्या तास थांबल्यानंतर आतमध्ये सोडले नसल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडीअोमध्ये बारामती टेक्सटाइल पार्कसमोर गाडी थांबलेली दिसते. यामध्ये सीईअो यांनी सांगितल्यामुळे पार्कचे गेट बंद केल्याचे सुरक्षारक्षक सांगत आहे. या व्हिडीओचे मोटारीमधील एका ज्येष्ठ महिलेने चित्रीकरण केले आहे. त्यांनी त्या सुरक्षारक्षकाला का लावले गेट, काय झालं? अशी विचारणा केली. आतमध्ये आम्हाला खरेदी करायची आहे, आम्ही काय चोरी करायला आलो आहे का,असा सवाल देखील या महिलेने सुरक्षारक्षकाला केला आहे. त्यावर तो साहेबांनी सांगितल्यामुळे मी गेट बंद केले आहे, माझी तेवढीच ड्युटी आहे असे सांगतो आहे. तर चित्रीकरण करणारी ती महिला साहेबांना फोन करा, त्यांना सांगा की आम्हाला आतमध्ये जात खरेदी करायची आहे, असे सांगत आहे. परंतु सुरक्षारक्षक गेट न उघडण्यावर तसेच फोन न करण्यावर ठाम असल्याचे दिसते. तुम्हीच साहेबांना फोन करा, त्यांनी सांगितले तर मी गेट उघडेन असे तो म्हणाल्याचे व्हिडीअोत दिसून येत आहे.