प्रदूषणाने गुदमरतोय मुठामाईचा श्वास!Pudhari
Published on
:
01 Feb 2025, 5:47 am
Updated on
:
01 Feb 2025, 5:47 am
वारजे: दूषित पाण्यामुळे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा (जेबीएस) प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच मुठा नदीतील वाढत्या जलप्रदूषणामुळे वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसरातील गावांचा कचरा, मैलापाणी व सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते.
वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरे परिसरासह आसपासच्या गावांचा कचरा, मैलापाणी आणि परिसरातील अनेक कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीपात्रात जलप्रदूषण होत असून, पाण्याला काळसर रंग आला आहे. काही ठिकाणी रासायनिक तवंगही पाहायला मिळत आहे.
यामुळे दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या जलप्रदुषणामुळे पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुठा नदीचा श्वास गुदमरला जात आहे. शिवणे, नांदेड व दांगट इस्टेट परिसरातील औद्योगिक कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी, तसेच लोकवस्त्यांमधील सांडपाणी थेट ओढे-नाल्याद्वारे नदीमध्ये येत आहे. तसेच दररोज मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा टाकला जात आहे. परिणामी जलप्रदूषण होत असल्याने नदीपात्रात जलपर्णी फोफावत आहेत.
सध्या नदीतील पाण्याचा प्रवाह वाहता नसल्यामुळे ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याची डबकी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे डासांची प्रादुर्भाव वाढल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
माशांच्या प्रजाती होताहेत नष्ट
मुठा नदीतील जलप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने पात्रातील माशांच्या काही प्रजाती नष्ट होत आहेत. नदीतील पाण्याला सध्या काळसर रंग आला असून, परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. महापालिका प्रशासनाने परिसरात नदी सुधार योजना वेगाने राबवून तत्काळ काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुठा नदी पात्रात दुर्गंधीयुक्त पाण्यात मासेमारी केली जात असून, तेच मासे विक्रीस येतात. हे नागरिकांना माहीत नसते. सध्या ’गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नदी पात्रातील प्रदूषण आणि या ठिकाणी होणारी मासेमारी मानवी आरोग्याला अपायकारक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
-विजय इंगळे, उपाध्यक्ष, मनसे खडकवासला विधानसभा मतदारसंघ
नदीत जागोजागी सांडपाणी सोडले जात आहे. तसेच राडारोडा आणि कचरा देखील सर्रासपणे टाकला जात आहे. प्रशासनाने नदीतील पाणी प्रदुषित करणार्यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच नदीसुधार योजना वेगाने राबवून पात्रालगत सीमाभिंत उभारणे गरजेचे आहे.
-अमर बराटे, रहिवासी, वारजे
समाविष्ट अकरा गावांच्या मलनिस्सारण व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध झाला आहे. वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे कोपरे गावांतील मैलापाणीसाठी नदीपात्रालगत मोठी ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. या गावांतील मैलापाणी ड्रेनेज लाइनद्वारे वारजे येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाला जोडले जाणार आहे.
-जगदीश कान्होरे, मुख्य अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका