प्रासंगिक – सीमेवरचा ‘तो’ झंझावाती दौरा

3 days ago 2

>> विनायक श्री. अभ्यंकर

दिल्लीच्या  राजकीय वर्तुळात त्या वेळी चिंतेचं वातावरण पसरलं होतं. ‘लाल ड्रगन’नं अर्थात् चीननं चौदा पोलिसांचे मृतदेह पाठवून दिले होते! चीनच्या या विश्वासघातकी कृतीमुळं त्यावेळचे पंतप्रधान नेहरूंना धक्का बसला होता. इतक्यात उत्तरेकडून बातमी आली की, ‘बोमदिला’ ठाणं पडलं. शीख रेजिमेंट, कुमाऊं, मराठा इन्फन्ट्रीचे जवान प्राणाची बाजी लावून लढले. अपुरा दारूगोळा, भयभीत झालेलं प्रशासन या प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जवान पाठ न दाखवता छातीवर गोळय़ा झेलत धारातीर्थी पडले. कुमाऊं रेजिमेंटच्या 114 पैकी 108 जवानांनी बलिदान केलं, तर सहाजण युद्धबंदी.

चीनच्या लाल सेनेनं आसामच्या वेशीपर्यंत मुसंडी मारली आणि भारतीय प्रजासत्ताकाला आव्हान दिलं. अशा वेळी काँग्रेसच्या तरुण, जिगरबाज नेतृत्वानं असं ठरवलं की, आसामच्या जनतेत धीर, आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. त्यानुसार ‘आसाम फूट हिल’ या ईशान्य रणभूमीचा दौरा करून स्थानिक जनतेत निर्माण झालेली भीतीची भावना थांबवायची, असा निश्चय या तरुण नेतृत्वानं केला.

त्यानुसार हे तरुण नेतृत्व तत्कालीन गृहमंत्री लालबहादूर शास्त्रींच्या कार्यालयात दाखल झालं व म्हणालंः ‘‘शास्त्रीजी, मी ईशान्य सीमेचा दौरा करणार आहे. एका राजकीय पक्षाची अध्यक्ष व भारतीय नागरिक म्हणून तिथल्या सामान्य जनतेला आधार, धीर देणं गरजेचं आहे. हा माझा निर्धार आहे आणि मी हा दौरा गाजावाजा न करता करणार आहे.

यावर शास्त्रीजी असमर्थता प्रकट करत म्हणालेः ‘‘ते शक्य नाही. सीमेवरची परिस्थिती फार बिकट असून, तुमच्या आयुष्याचं मोल महत्त्वाचं आहे. मला माफ करा. ही बातमी विरोधकांना कळली तर काय परिस्थिती होईल, याचा कृपया विचार करा.’’ पण मग डी.पी. धर या तत्कालीन मुख्य सचिवांना शास्त्रीजींनी बोलावलं व असा दौरा शक्य आहे का, अशी विचारणा केली. ‘विशेष बाब म्हणून हे शक्य आहे,’ असं उत्तर धर, पी. एन. हक्सर आदी मान्यवरांनी देताच या तरुण नेतृत्वाला बळ मिळालं. दौऱ्याची आखणी झाली. एका खास मुलकी हेलिकॉप्टरमधून या ईशान्य सीमा भागात पेटलेल्या सीमेचा आठ तास दौरा या तरुण नेतृत्वानं केला. इथं एक गोष्ट महत्त्वाची, की कोणत्याही विरोधी नेत्यानं या दौऱ्याला विरोध केला नाही. उलट शास्त्रीजींचे दूरध्वनीवरून आभार मानले. तेव्हाचे विरोधी नेते परिपक्व होते. या दौऱ्याची माहिती नेहरूंपासून लपवून ठेवण्यात आली होती. कारण नेहरूंनी या दौऱ्याला विरोध केला असता व दुसरं कारण म्हणजे ते तरुण नेतृत्व म्हणजे इंदिरा गांधी होत्या आणि तो दिवस होता 19 नोव्हेंबर 1962. म्हणजे इंदिरा गांधी यांचा वाढदिवस.

20 नोव्हेंबर रोजी युद्धबंदी जाहीर झाली. युद्ध थांबलं. अनेक संकटं अंगावर झेलत, प्रतिकूलतेचा सामना करत समोरच्याला चीतपट करणाऱ्या इंदिरा गांधींच्या भावी आयुष्याची जणू काही ही नांदीच होती. चीनच्या या युद्धाच्या अनुभवातून 1971 च्या बांगलामुक्ती संग्रामाचं बिजारोपण झाले आणि आपण ‘बांगलादेश’ मुक्त केला.

नौसेनेत वार्षिक ‘कमांडर कॉन्फरन्स’ अत्यंत महत्त्वाच्या. एक प्रकारचे हे सैनिकी संमेलनच. यात रणनीतीची, भविष्याची सैनिक कारवायांची चर्चा होते. संरक्षणमंत्री हे या संमलनाचे अध्यक्ष, असा रिवाज. ऍडमिरल जाल कर्सेटजी नौसेना अध्यक्ष असतानाची ही गंमत. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींकडे संरक्षण खाते होते. या कमांडर कॉन्फरन्सची तारीख ठरल्यानंतर संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती नौसेना अध्यक्ष या नात्याने ऍडमिरल कर्सेटजींनी इंदिरा गांधी यांना केली. या संमेलनाच्या समारोपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी इंदिरा गांधींनी वेळात वेळ काढून स्वीकारलीही. सायंकाळी त्या समारोपाला अध्यक्ष म्हणून पोहचल्या. कर्सेटजींनी आपल्या एकेका वरिष्ठ कमांडरची ओळख इंदिराजींना करून द्यायला सुरुवात केली. कमांडर्सचे गुणगान करत असताना अचानक त्यांनी इंदिराजींना विचारले-

‘‘आप के ध्यान में तो रहेगा ना…?’’ इंदिराजी तेवढय़ाच हजरजबाबी. त्या दुपारच्या जेवणाचा आणि ‘थोडीशी’ घेण्याच्या कार्यक्रमाचा संदर्भ घेत पटकन म्हणाल्या… ‘‘ये तो आप कितने समझदार, संयमी और सतर्क है इसपर निर्भर है!’’ थोडक्यात, किती शुद्धीत आहात त्यावर अवलंबून आहे, असा टोमणा त्यांनी लगावला. अर्थात दुपारच्या कार्यक्रमाचा उल्लेख टाळताच त्यांनी ‘सतर्कता’वर जोर दिला होता.. कमांडोजनेही हसत हसत टाळय़ांच्या गजरात इंदिराजींच्या विनोदाला दाद दिली.. स्वतः कर्सेटजीही त्यात सामील झाले. इंदिराजींचा मिजाज इतका खिळाडू वृत्तीचा होता!

 ( लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article