फडणवीस की मराठा चेहरा; तीन M वर चर्चा, मुख्यमंत्री पदाचा आज होणार फैसला, मोदी-शहांकडून पुन्हा धक्कातंत्र?

1 hour ago 2

राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होईल की महायुतीचा मुख्यमंत्री असेल याविषयी आता चर्चा रंगली आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री पदावर कोणतीच आडकाठी न ठेवता थेट भाजपाला, पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यानंतर दोन दिवस एकनाथ शिंदे हे पण दावेदार असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यांच्या शिलेदारांनी या मुद्दाला हवा दिली. पण काल माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांनी या सस्पेन्सवर एकदाचा पडदा टाकला. अजित पवार यांच्यानंतर त्यांनी सुद्धा भाजपा जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे जाहीर केले. पण भाजपा राज्यात पुन्हा धक्कातंत्र देण्याची चर्चा पण जोरात आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की मराठा उमेदवार देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महायुतीचे वारू उधळले

राज्यात महायुतीने भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. त्यांना इतका मोठा झटका बसेल असे वाटले नव्हते. महाविकास आघाडीचा 50 जागांच्या आत खेळ आटोपला. तर महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या.

हे सुद्धा वाचा

तीन M वर चर्चा

आज महायुतीमधील दिग्गज नेते हे दिल्ली दरबारी उपस्थित असतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची संध्याकाळी पाच वाजता बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या तीन एमवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खलबतं झाली. त्यावेळी सुद्धा हे तीन मुद्दे समोर असल्याचे समजते.

देवाभाऊ की मराठा नेता

राज्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून मराठा आंदोलन अधिक तीव्र झाले. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आरक्षणाची लढाई गाजली. त्यांच्या उपोषणामुळे सरकारने अनेकदा नमतं घेतलं. तरीही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष कमी झाला नाही. त्यांनी आता सुद्धा सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषणाचा एल्गार दिला आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा यांच्यातील दरी कमी करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. काही नेत आजही सर्वसामावेशक आहेत. ते ओबीसी आणि मराठा समाजासह सर्वांसाठी अनुकूल आहेत.

ओबीसींच राजकारण करून आता सत्तेत आलेल्या भाजपासमोर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं का याची चाचपणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकारणाची दिशा काय असेल. त्याचा राज्यात काय संदेश जाईल याची चर्चा होत आहे. दुसरीकडे बिगर मराठा चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील याची पण चर्चा होत आहे. ब्राह्मण, मराठा आणि ओबीस या तिघांना वगळून वेगळाच फॅक्टर समोर आणता येण्याची शक्यता पण काही जण वर्तवत आहेत.

महिला मुख्यमंत्री?

भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे रेटण्यात येत होते. या दोघांनी याविषयीचा निर्णय दिल्लीतून होईल हे स्पष्ट केले आहे. अनेकांना मोदी आणि शाह हे राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवत आहेत. काहींच्या मते लाडक्या बहि‍णींनी महायुतीला भरभरून मतं दिली. लाडक्या बहि‍णींच्या मताचा हा वाढीव टक्का महायुतीच्या विजयासाठी जोरकस ठरला. त्यामुळे ज्या मुद्याची राजकारणात चर्चा होत नाही, असाच मुद्दा अजेंड्यावर येऊ शकतो. कदाचित राज्यात महिला मुख्यमंत्री होऊ शकते. अर्थात या सर्व जर-तरच्या चर्चा आहेत. पण मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये भाजपाने यापूर्वी वेगळे प्रयोग करून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राजकारणात मध्यप्रदेश, राजस्थान हा पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? असा पण काही जणांचा दावा आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article