Published on
:
22 Jan 2025, 4:33 am
Updated on
:
22 Jan 2025, 4:33 am
मालेगाव : येथील तहसील कार्यालय व महापालिकेकडून बांगलादेशी -रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास समितीने (एसआयटी) पथकाने मंगळवारी (दि. 21) येथील तहसील कार्यालयात दाखल होत कागदपत्रांची तपासणी केली.
मालेगावमध्ये बांगलादेशी व रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले असून, तहसील व महापालिका कार्यालयाकडून प्रारंभी एक हजारपेक्षा अधिक बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी समितीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, समितीच्या कागदपत्र तपासणीवेळी मनपा आयुक्त रवींद्र जाधव, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक तेगबीरसिंह संधू, सुरज गुंजाळ आदीसह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत चार हजार घुसखोरांना दाखले
गेल्या आठवड्यात माजी खा. सोमय्या हे मालेगावी आले होते. त्यावेळी त्यांनी तहसील कार्यालय व महापालिकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत चार हजार बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना जन्म प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच त्यांनी बनावट 100 जणांची नावे आणि पुरावे छावणी पोलिसांना सादर केले होते.
दस्तांची सखोल चौकशी होणार
चौकशीसाठी एसआयटीचे अध्यक्ष तथा नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधी, नगरविकास नाशिक शाखेचे विभागीय सहआयुक्त नितीन पवार, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या समितीने येथील तहसील कार्यालय व महापालिकेतून दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांचे पुरावे, स्वयंघोषणापत्र व इतर पुराव्यांची तपासणी केली. ही तपासणी तब्बल दीड तास चालली. या दस्तांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.